अर्ध नारीनटेश्वर स्वरूपातील भारतातील एकमेव परळी ची जागृत कालराञी देवी. India’s only Parli-awakened Kalratri Devi in Ardha Narinateswara form

शिव, शक्ती आणि भक्ती चा ञिवेणी संगम असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे परळी चे धन्वंतरी प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग होय.अनेक कालखंडात अनेक देवी, देवता, ऋषी मूनींच्या आणि साधुसंताच्या वास्तव्याने पुनीत असलेल्या परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्राचा महिमा अनन्यसाधारण आहे. असेच एक अद्भुत आणि देशातील एकमेव ठरणारे अर्धनारीनटेश्वर रूपातील माता कालराञी देवी चे जागृत असलेल्या देवीची माहिती शारदीय नवराञी उत्सवा निमीत्ताने परळी वैद्यनाथ पंचक्रोशीचे अभ्यासक गोपाळ आंधळे यांच्या लेखनीतून भाविकांसाठी देत आहोत.
परळी शहरातील जुन्या गावभागतील मांडववेस रोड वर, भीमनगर वस्तीत शहराच्या पुर्वेस कालराञी देवी चे पुर्वाभिमुख अर्धनारीनटेश्वर रूपातील मंदिर आहे.
अर्धनारीनटेश्वर शिवाचे एक रूप. शिवाच्या शरीराचा उजवा अर्धा भाग पुरुषरूप व डावा अर्धा भाग स्त्रीरूप असल्यामुळे ‘अर्धनारी’ आणि गांधर्ववेदाचा तो निर्माता तसेच नृत्यप्रिय असल्याने ‘नटेश्वर’ असे त्यास म्हणण्यात येते. मैथुनोपायाने प्रजानिर्मिती करण्याकरिता ब्रह्मदेवाने शिवाची प्रार्थना केल्यामुळे शिव या रूपात अवतरला. नंतर त्याचे पुरुष व स्त्री असे वेगवेगळे भाग झाले त्यानंतर पुरुषरूपाचे अकरा व स्त्रीरूपाचे अनेक भाग झाले ब्रह्मदेवाच्या क्रोधापासून ‘अर्धनारीरूद्र’ उत्पन्न झाला इत्यादी कथा पुराणांत आढळतात. ‘अर्धनारीश्वर’ ही एक तांत्रिक देवताही आहे. शिव-शक्ती, पुरुष-स्त्री, लिंग-योनी यांचा संयोग हे सृष्टिनिर्मितीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच ‘अर्धनारीनटेश्वरा’स तसा प्रतीकात्मक अर्थ आहे. वेदांतही सोम व अग्नी यांना विश्वाचे माता-पिता कल्पिले आहे. अर्धनारी, अर्धनारीश, अर्धनारीश्वर इ. अर्धनारीनटेश्वराचीच पर्यायी नावे आहेत. इ.स.च्या सु. पहिल्या शतकापासून भारतात अर्धनारीनटेश्वराची अतिशय सुंदर शिल्पे कोरलेली आढळतात. वेरूळ व घारापुरी येथील त्याची शिल्पे प्रख्यात आहेत.
याच प्रमाणे परळी येथील कालराञी देवी च्या मुर्तीचे वैशिष्ट्ये असेच आहे. समोर दिसणारा मुखवटा (तांदळा)कालराञी देवीचा आहे आणी मुखवट्याचा पाठीमागचा अर्धाभाग लिंग स्वरूपाचा आहे. म्हणजे पाठीमागे शिवलिंग आहे.