आपला जिल्हा

खळबळ माजवली म्हणून संपादक गंमत भंडारी वर गुन्हा दाखल केला, अधिकाऱ्यांनीही तीच चूक केली आता पोद्दार साहेब गुन्हा दाखल करणार का ?

बीडकोविड संशयित पोलीस कर्मचारी बीड जिल्ह्यात येऊन गेला असे वृत्त संपादक गंमत भंडारी यांनी छापताच त्यांच्या वृत्तामुळे जनतेत खळबळ माजून भीतीचं वातावरण पसरलं असं सांगत त्यांच्यावर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या यंत्रणेने गुन्हा दाखल केला. मात्र असाच प्रकार मंगळवारी प्रशासकीय यंत्रणेतील दिग्गज अधिकाऱ्यांनी केला. बेलापुरी ऐवजी बालेपीर तसेच सिरसदेवी गेवराई तालुक्यात असून बीड तालुक्यात असल्याची चुकीची माहिती देत येथे कोरोना रुग्ण सापडला असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले याआधारे प्रसिद्धीमाध्यमांनी बातम्या छापल्या त्यामुळे एकच खळबळ माजली बालेपीर भागातील व बीड तालुक्यातील जनता भयभीत झाली. मग आशा चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून हर्ष पोद्दार कर्तव्यदक्ष पणा दाखवणार का असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे.

कोरोना महामारीचे संकट आल्यानंतर राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. अन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रसिद्धीमाध्यमांना धारेवर धरण्याची आयती संधी चालून आली. परिणामी न्यूज चैनल चे पत्रकार महिंद्र मुधोळकर यांच्यावर गुन्हा दाखल करतात आपली नियत प्रशासनाने सिद्ध केली. याच दमनकारी नीतीचा वापर करत बीडचे दैनिक पार्श्वभूमी चे ज्येष्ठ संपादक गंमत भंडारी यांनी कोरोना संशयित पोलीस कर्मचारी मुंबईहून जिल्ह्यात येऊन गेल्या संदर्भातली बातमी प्रकाशित केली. परिणामी त्यांनी जनतेत खळबळ माजवत भीतीयुक्त वातावरण तयार केले असा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दमनकारी नीतीचा अनुभव जवळपास बहुतांश पत्रकारांना आला.
अनलॉक वन सध्या सुरू असून अद्यापही आपत्ती व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात आलेला नाही. जर जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणारे पत्रकार मुधोळकर व संपादक गंमत भंडारी कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार आहेत तर हाच नियम प्रशासनातील अधिकाऱ्यांना लागू होत नाही काय ? मंगळवारी जिल्हा माहिती कार्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुप वरून पत्रकारांना कोरोना रुग्ण कोणत्या भागात सापडले यासंदर्भात चुकीची माहिती देण्यात आली. ही माहिती अधिकृत आहे म्हणून बहुतांश माध्यमांनी या संदर्भातले वृत्त प्रकाशित केले. या ग्रुप वरून दिल्या गेलेल्या माहितीत बेलापुरी ऐवजी बालेपीर भागात रुग्ण सापडल्याचा उल्लेख केला गेला होता तसेच सिरसदेवी हे गाव गेवराई तालुक्यात असताना बीड तालुक्यात असल्याची माहिती दिली गेली होती. मात्र अर्धा एक तासानंतर ती माहिती खोडून पुन्हा दुसरी माहिती देण्यात आली. मात्र प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी अशी चुकीची माहिती दिल्यामुळे काही काळ का होईना बालेपीर व बीड तालुक्यात खळबळ माजली व जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चूक झाली तरी ते कोविड योद्धे म्हणून त्यांना कायदा लागू होत नाही काय ? मग या चुकीबद्दल या ग्रुप वरील कोणत्या अधिकाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे .अधिकाऱ्यांना चूक करायला मोकळीक असते काय ? प्रशासनात काम करणारे अधिकारी माणस आहेत म्हणून चूक होऊ शकते हे मान्य केलं तर मग हाच नियम पत्रकारांना लागू होऊ शकत नाही काय ? या महामारीच्या संकटात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून पत्रकारही जोखीम पत्करून वृत्तसंकलन करत आहे. असं असताना माध्यमांना विश्वासात घेऊन व्यापक मोहीम प्रशासनाला राबवता आली नसती काय ? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close