ध्वजारोहण सुरू असतानाच तरुण शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. A young farmer attempted self-immolation while the flag hoisting was going on

बीड — जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच एका तरुण शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत तरुणाला वेळीच रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सुरेश शिवाजी उपाडे वय ३२,रा. रेवली ता. परळी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलांसह त्यांना दोन काका आहेत. मात्र, एका काकांच्या निधनानंतर दुसऱ्या काकाने तीनऐवजी दोनच वारसदार दाखवून वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल केल्याचा सुरेश उपाडे यांचा आरोप आहे. जमिनीच्या तीन वाटण्या समान हिस्स्यात कराव्या, यासाठी ते तलाठी व तहसील कार्यालयात खेटे मारत होते.तसेच
काही दिवसांपूर्वी त्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण देखील केले होते. मात्र, न्याय न मिळाल्याने त्यांनी अखेर आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. ध्वजारोहण सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरेश उपाडे हे हातात पेट्रोलचे कॅन घेऊन आले. पेट्रोल अंगावर ओतत असतानाच शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि. केतन राठोड, गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच सिरसाळा ठाण्याचे अंमलदार तुषार गायकवाड, आशुतोष नाईकवाडे यांनी त्यांना त्यास ताब्यात घेत कॅन व काडीपेटी हिसकावून घेतली. त्यानंतर या तरुणास पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर ठाण्यात नेले.