बिलकिस बानोला न्याय द्या; अत्याचार थांबवा या मागण्यांसाठी मुस्लिम महिलांचा एल्गार. Give justice to Bilkis Bano; Muslim Women’s Elgar Demands Stop Atrocities

बीड — अल्पसंख्याकांवरील वाढते हल्ले, गुजरात येथील बिलकिस बानो अत्याचारातील आरोपींची शिक्षा माफ केल्याच्या निषेधार्थ संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता किल्ला मैदान येथून सुरू झालेला महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. या मोर्चात मुस्लिम समाजाच्या हजारो महिलांनी शिस्त व शांततेत सहभाग नोंदवला. गेवराई केज माजलगाव धारूर पाटोदा तहसीलवर देखील मोर्चा काढण्यात आला.
मिल्लिया महाविद्यालय परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. बलभीम चौक, कारंजा, राजुरी वेस, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात लहान मुलांपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला.अत्यंत शांततेत निघालेला हा मोर्चा कलेक्टर कचेरीवर धडकला तेव्हा तीन ते चार महिलांनी मोर्चेकर्यांना संबोधित केले.या मोर्चाचे एका सभेत रूपांतर झाले आणि तिथे मुस्लिम समाजाच्या पाच विद्यार्थिनींनी मोर्चाला संबोधित केले. ‘भारत हा गंगा जमूनी तहजीबने चालणारा देश आहे, या देशावर सर्व धर्मांचा समान अधिकार आहे, कोणत्याही एका धर्माचा हा देश नसून, या देशातील प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार असल्याचे’ प्रतिपादन या विद्यार्थिनींनी यावेळी केले.
या वेळी या वक्तव्यांमध्ये मोर्चेकर्यांचं प्रतिनिधीत्व करताना सरकारविरुद्धचा संताप दिसून आला. बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना पुन्हा शिक्षा करा, अनाधिकृत पाडले जाणारे मदरसे पाडणे बंद करून ते पुन्हा बांधा, मुस्लिमांवर होणार्या अन्याय-अत्याचारासह हल्ल्यांविरोधात अॅट्रासिटीसारखा कायदा करा, मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावरील खोटे आरोपी दूर करून त्यांना निर्दोश मुक्त करा, बलात्कार्यांना फाशी द्या, महिला सुरक्षेसाठी कठोर पावले उचला यासह अन्य मागण्यांचं थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना लिहिलेलं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.