पिक विमा: भाजपा व शिंदे गटाला शेतकऱ्यांची अॅलर्जी; त्यामुळेच सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवली! Crop insurance: Allergy of farmers to BJP and Shinde group; That is why he turned his back on the all-party meeting!

बीड — नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पूर्ण कोलमडून गेला असताना जिल्ह्यातला आत्महत्यांचा वाढता आकडा थांबायला तयार नाही. अशा स्थितीत शेतकरी अग्रीम विमा मिळावा यासाठी आक्रमक झाला. शेतकरी पुत्रांनी समाज माध्यमातून विरोधाचा ट्रेंड चालवला सर्व पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघटित झाले मात्र सत्ताधारी भाजप व शिंदे गटाला मात्र शेतकऱ्यांची एलर्जी झाली आहे. त्यामुळेच अजून एकानेही सरकारी मदत असो अथवा अग्रीम विम्याचा प्रश्न याबाबत “ब्र” देखील काढला नसल्याचं पाहायला मिळत आहे.
शेतकरी आसमानी सुलतानी संकटाचा सामना करत असताना त्याचा धीराचा बांध फुटू लागला आहे. सत्तेत कोणीही असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशास पडत आली आहे. निराशेपोटी आत्महत्यांचा आकडा वाढताच आहे. मात्र सुशिक्षित युवा पिढी कुठेतरी आपल्या न्याय हक्काचा विचार करत आता आक्रमक होऊ लागल्याचं दिसू लागला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना अग्रीम विमा मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सोळा महसूल मंडळाचा समावेश केल्याची माहिती मिळताच शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आंदोलन होऊ लागली त्याला प्रतिसादही मिळू लागला शेतकऱ्यांची मुलं सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागली. सगळ्यांनीच “तुझ्या बापाचा विमा कोणी खाल्ला? तुझ्या दादा,भाऊ, अण्णा,भैय्या ताईला प्रश्न विचारायला शिक शेतकऱ्यांच्या पोरा आता लढायला शिक यासारखा ट्रेंड चालवला.त्यामुळे प्रशासन पंचनामे ,पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत असताना झोपेत असलेले लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले. लोकप्रतिनिधींनी सर्वपक्षीय बैठक बोलावून 16 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. या सर्वपक्षीय बैठकीला जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
राज्य सरकारने सर्वच जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अनुदान वाटप केलं बीड जिल्ह्याच्या तोंडाला नुकसान होऊनही पान पुसण्याचं प्रामाणिक काम केलं. असं असलं तरी मात्र सत्तेचं लोणी आपल्या वाट्याला कधी येणार याची वाट पाहत बसलेल्या जिल्ह्यातील सत्ताधारी बोक्यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे डोळेझाक करत बैठकी कडे पाठ फिरवली. हा लढा शासनाविरुद्ध नसून विमा कंपनी विरुद्ध असल्याचा विसर त्यांना पडला आहे. भाजप व शिंदे गटाला आपल्याला शेतकऱ्यांच्या जीवावरच राजकारण करायचं आहे त्यांच्या जीवावरच आपलं राजकीय अस्तित्व अवलंबून आहे याचा विसर पडला. उद्या शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे अग्रीम मिळालाच तर आपण कसा पाठपुरावा केला त्यामुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं सांगत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार आहेत. शिंदे गटाला तर आणखी राजकीय अस्तित्व निर्माण करायचं आहे. मलिदा खाण्यासाठी पदापुरत यांना राजकारण करायचं आहे.पण सोयीस्कर रित्या जनतेच्या प्रश्नावर डोळेझाक करणारे हे नेते भविष्यात तरी किती जनतेच्या उपयोगी पडतील असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आज नाही तर कधीच नाही ही भूमिका शेतकऱ्यांनी घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करणाऱ्या या नेत्यांना भविष्यात त्यांची लायकी दाखवण्याची वेळ आली आहे. ती दाखवल्याशिवाय दाखव राहणारही नाहीत. एवढी चीड शेतकऱ्यात निर्माण झाली आहे.राहिला प्रश्न भाजपाचा आ.पवार सोडले तर ईतर नेत्यांचं “लोकांना आमची गरज आहे आम्हाला त्यांची नाही” असं म्हणणारे आपल्याच “अहं” विश्वात वावरणारे लोकप्रतिनिधी बद्दल वेगळं सांगायची गरज नाही. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असली तरी त्यांच्या वृत्तीत काही फरक पडल्याचं सध्या तरी दिसत नाही. एकंदरच सद्यस्थितीत शेतकऱ्यांमध्ये आपल्या न्याय हक्काबाबत निर्माण होत असलेली जागरूकता शेतकऱ्यांच्या भविष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे.