कृषी व व्यापार

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी रक्कम तुटपुंजी, पंचनाम्यांचे फेर सर्वेक्षण करण्याची धनंजय मुंडेंची पुन्हा मागणी. Dhananjay Munde’s demand for a re-survey of panchnamas, the amount of relief given to farmers in Beed district is meager.

धनंजय मुंडे यांच्या मागणीला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

गोगलगायीमुळे झालेल्या नुकसान भरपाई पोटी बीडसह तीन जिल्ह्याला मिळवून 99 कोटी रुपयांचा निधी मंजूर

बीड जिल्ह्यात गोगलगाय बाधित क्षेत्र 14 हजार हेक्टरवर मात्र मदत केवळ 3800 हेक्टरपुरतीच का? मुंडेंचा सवाल

मुंबई — बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात खरीप हंगामात गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांना विशेष अनुदान देण्याबाबत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात व बाहेर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले असून, राज्य शासनाने या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळून 98 कोटी 58 लाख रुपये निधी मदतीपोटी मंजूर केला असून यापैकी सुमारे 55 कोटी रुपये निधी वितरणासाठी उपलब्ध करून दिला आहे.

खरीप हंगामात सोयाबीनचे पीक ऐन जोमात आल्यानंतर शंखी गोगलगायीनी ते नष्ट केले. परिणामी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्या शेतकर्यांना विशेष मदत करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. या नुकसान झालेल्या शेतांमध्ये विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार , धनंजय मुंडे यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून शासनाकडे मदतीची मागणी केली होती.

धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने बीड जिल्ह्यासह लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय राज्य शासनाने आज निर्गमित केला आहे.

बीड जिल्ह्यात एकूण बाधित क्षेत्र 14 हेक्टर पेक्षा अधिक आहे मात्र बीड जिल्ह्यातील केवळ 3822 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे या शासन निर्णयात नमूद असून, यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात केवळ 2 कोटी 59 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

मुळात अंबाजोगाई तालुक्यासह विविध ठिकाणी झालेले नुकसान हे सुमारे 14 हजार हेक्टर क्षेत्रावर आहे, याची नोंद शासन दरबारी देखील झाली आहे, मात्र याचे अहवाल शासनास सादर करताना असे काय घडले की 70% बाधित क्षेत्र कमी दाखवले गेले, निर्गमित झालेल्या शासन निर्णयात बाधित क्षेत्र 3822 हेक्टर एवढेच दाखवले असून, मुळात आकडेवारी कित्येक पटीने जात असूनही शासन-प्रशासन अर्धवट आकडेवारी समोर का आणत आहे? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित करत, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेली मदत तुटपुंजी असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

गोगलगायीनी नुकसान झालेल्या क्षेत्राची व्याप्ती 14 हजार हेक्टरच्या वर असून, राज्य शासनाने सदर क्षेत्राच्या पंचनाम्यांचे वरिष्ठ स्तरावरून फेर सर्वेक्षण करावे व एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा समावेशक मदतीचा निर्णय घ्यावा, तोपर्यंत हा लढा चालूच राहील, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button