विमा कंपनीची वकिली करू नका,शेतकऱ्यांना 25% पिक विमा (crop insurance)द्यावाच लागेल — आ.पवार (Pawar)आक्रमक

गेवराई — अहो, जिल्हाधिकारी साहेब तुम्ही – आम्ही शेतकर्यांची लेकर आहोत. त्यामुळे, शेतकऱ्यांची काळजी करण्याची गरज आहे. ऐन दाणे भरायच्या काळात तब्बल वीस एकवीस दिवस पाऊस नव्हता. सोयाबीन, मूग पिकाला फटका बसलाय म्हणून, ज्यांचे नुकसान झाले त्यांना 25% अग्रीम द्यावाच लागेल. उगीच विमा कंपनीवाल्यांची वकिली करीत बसाल तर काळ माफ करणार नाही. अशी आक्रमक भुमिका आमदार लक्ष्मण पवार यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मांडली.
मंगळवार ता. 13 रोजी सकाळी 12 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, आमदार लक्ष्मण पवार, जिल्हा कृषी अधकारी जेऊरकर, भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, शेतकरी नेते डॉक्टर उद्धव घोडके, जेडी. शहा, ॲड. रासकर, प्रा. येळापुरे, बाबुरावखाडे, सतीश पाटील, सुंदर चव्हाण यांच्या उपस्थितीत 25% अग्रीम विम्या पासून वंचित राहीलेल्या शेतकऱ्यां संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सदरील बैठकीत आमदार पवार, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जेष्ठ नेते मुंदडा,जिल्हा कृषी अधिकारी जेऊरकर, शेतकरी नेते डॉक्टर उद्धव घोडके यांच्यात चर्चा झाली. साधकबाधक चर्चा सुरू असताना, आमदार पवार शेतकऱ्यांच्या विम्या संदर्भात आक्रमक झाले. कृषी विभाग व विमा कंपन्या सोयीनुसार धोरण ठेवून वागत आहेत. हे चांगले नाही. आम्ही म्हणतोय म्हणून
तुम्ही चुकीचे करू नका. आमचे तसे म्हणणे नाही. मात्र, 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने शेतीचे नुकसान झालेले आहे. तुम्ही ऐकणार नसाल तर मग आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच उपोषण करावे लागेल, असा इशारा ही आ. पवार यांनी बैठकीतच दिला. जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, डॉक्टर उद्धव घोडके, जेडी शहा यांनी पोटतिडीकीने शेतकऱ्यांची बाजू मांडली. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा या॔नी ही सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, कृषी अधिकारी जेऊरकर सकारात्मक-नकारात्मक बोलत राहील्याने आमदार पवार नाराज झाले. सोशल माध्यमांवर लोक काय म्हणतात ते आधी बघा. आमचे फिरणे मुश्किल होईल. ज्यांना चटके बसलेत ते सर्व शेतकरी गप्प बसणार नाहीत आणि आम्हाला ही गावात फिरू देणार नाहीत. याचे भान ठेवून योग्य न्याय द्या, अशी मागणी आ. पवार यांनी केली. आपण दोन दिवसात कृषी मंत्र्यांना भेटणार असल्याचे ही त्यांनी शेवटी सांगितले.