महिला कलाकार छोट्या असोत की मोठ्या, त्यांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची लोककला-लावणीचा अवमान करू नका – अभिनेत्री अमृता खानविलकर Women artists whether young or old, honoring them is Maharashtra’s culture, don’t disrespect Maharashtra’s folk art-Lavani – Actress Amrita Khanwilkar

अजय – अतुल यांच्या जबरदस्त परफॉर्मन्सने परळीकरांना ‘याड लावलं…!’
कलाकारांची कला घरात बसून नाही तर लोकांसमोर दाखवून वाढते, अशी संधी धनुभाऊ उपलब्ध करून देत असतात म्हणून त्यांचे आभार – अतुल गोगावले
धनु भाऊंच्या विनंती नुसार दिवाळीत संपूर्ण चमू घेऊन 4 तासांचा शो करणार – अजय गोगावले
महाराष्ट्राची परंपरा असलेल्या लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांवर टीका करणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान – धनंजय मुंडेंनी घेतला ‘त्यांचा’ समाचार
अजय-अतुल जोडीच्या ‘याड लागलं, माऊली माऊली, वाट दिसू दे, देवा श्रीगणेशा…’ अशा अनेक गीतांना धनु भाऊंसह परळीकरांनी दिले स्टँडिंग ओव्हेशन…
परळी — कुठलाही कलाकार आपली कला घरात बसून झाकून ठेवून वाढवू शकत नाही, तर तो ती लोकांसमोर सादर करून वाढवत असतो व मोठा होत असतो. नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून धनु भाऊ अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना संधी उपलब्ध करून देत असतात म्हणून त्यांचे आभार मानले पाहिजेत, अशा शब्दात धनंजय मुंडे करत असलेले सामाजिक कार्य व नाथ प्रतिष्ठान मार्फत आयोजिलेल्या कार्यक्रमांचे सुप्रसिद्ध गायक-संगीतकार अजय-अतुल जोडीतील ज्येष्ठ बंधू अतुल गोगावले यांनी कौतुक केले.
आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत परळी येथे सुरू असलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात शनिवारी सायंकाळी अंतरराष्ट्रीय कीर्तीचे व मराठी मातीतील अस्सल कलाकार अजय-अतुल यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर चंद्रमुखी फेम अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही आपली नृत्य कला यावेळी सादर केली. अजय-अतुल यांच्या जबरदस्त परफॉर्मन्सने यावेळी उपस्थित परळीकरांची तुफान दाद मिळवत मने देखील जिंकली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजय – अतुल जोडीचा व अमृता खानविलकर यांचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते मानचिन्ह, फेटा व हार घालून आदर सत्कार करण्यात आला. प्रथेप्रमाणे अमृता यांना साडी देखील भेट देण्यात आली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर टीका करणाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला. ‘हममे नाम है, इसिलीये हमे बदनाम कर रहे हो?’ असा टोला त्यांनी लगावला. विविध लोककला, लावणी, सांस्कृतिक कार्यक्रम ही महाराष्ट्राच्या मातीची परंपरा आहे. अशा पारंपरिक कार्यक्रमांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
सांस्कृतिक कार्यक्रमांवरून विविध सामाजिक कार्यात व संकट काळात सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नाथ प्रतिष्ठान या संस्थेला बदनाम करण्यापेक्षा, तुमचा राग माझ्यावर असेल तर व्यक्तीगत माझ्यावर टीका करा, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानने आजवर राबवलेल्या विविध उपक्रमांची आठवण काढून देत ‘त्या’ टीकाकारांच्या डोळ्यात अंजन घातले.
धनुभाऊंसारख्या लोकाभिमुख नेतृत्वाच्या निमंत्रणाला मान देऊन अनेक कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात. लहान असोत की मोठ्या असोत पण महाराष्ट्राच्या कलेची उपासना समजल्या जाणाऱ्या लावणी सारख्या कार्यक्रमांवरून कोणी महिला कलाकारांना लक्ष्य करत असेल, वृत्त वाहिन्या किंवा आणखी कोणी लावणी सारख्या लोककलेला अश्लीलतेचे नाव देत असेल तर ते पाप ठरेल, महाराष्ट्राच्या लोककलेची जगभर ओळख म्हणून लावणी प्रसिद्ध आहे. अंगभर कपडे घालून, शृंगार रस सादर करणारी लावणी, त्यात काही व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा केवळ ट्रोल करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन गालबोट लावू नये असे खडे बोल अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी सुनावले.
दरम्यान आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अमृता खानविलकर यांनी त्यांच्या आगामी चंद्रमुखी चित्रपटातील ‘चंद्रा’ या प्रसिद्ध गीतावर आपली नृत्य कला सादर केली.
अजय-अतुल या जोडीने तर याड लागलं, माऊली-माऊली, वाट दिसू दे गा, झिंगाट, देवा श्रीगणेशा अशी एकापेक्षा एक गीते आपल्या बहारदार आवाजात व सुरेल संगीताच्या साथीने सादर केली. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या धनंजय मुंडे यांच्यासह परळीकरांनी स्टँडिंग ओव्हेशन देत या जोडीच्या गीतांची तारीफ केली.
दरम्यान मोंढा मैदान येथील मैदान हे नागरिकांनी तुडुंब भरून अक्षरशः उभा राहायला देखील जागा उरली नव्हती. त्याचबरोबर निवडक ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेल्या ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून देखील हजारो नागरिकांनी हा संगीत रजनी कार्यक्रम डोळे भरून पाहिला.
दिवाळीत पुन्हा येणार
दिवाळी मध्ये अजय – अतुल यांचा संपूर्ण कार्यक्रम तोही यापेक्षा मोठ्या जागेत आयोजित करण्याचे निमंत्रण धनंजय मुंडे यांनी दिले असता, धनुभाऊ आमचा कार्यक्रम करायचा म्हणतात, तर दिवाळी मध्ये अजय-अतुल संगीत समूहाचा संपूर्ण चमू घेऊन, दिवाळी मध्ये संपूर्ण 4 तासांचा लाईव्ह शो घेऊन परळीत पुन्हा येणार असल्याची घोषणा जोडीतील अजय गोगावले यांनी केली. या कार्यक्रमात संयोजक व पार्श्वगायक दर्शन साटम, नचिकेत देसाई, पार्श्वगायिका कविता राम यांनीही बहारदार गीते सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले.
वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन तर गोपीनाथगड येथे केले अभिवादन
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या निमंत्रणानुसार प्रथमच बीड जिल्ह्यात आलेल्या अजय-अतुल जोडीने धनंजय मुंडे यांच्या समवेत परळी शहरातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. त्याचबरोबर त्यांनी गोपीनाथ गड येथे जाऊन स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या सामाजिक व राजकीय कार्याची माहिती अजय-अतुल यांना देत स्व. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.