राजकीय

बीडची विधानसभा निवडणुक आपले लक्ष — प्रा. सुरेश नवले.Beed assembly election your attention — Prof. Suresh Navale

गेवराई — महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका तासात जेवढ्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या, असे दिलासादायक चित्र दिसत असताना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात किती नागरिकांना भेटी दिल्या. अशी उपरोधिक टिका माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, नागरिकांच्या हितासाठी सदैव तत्पर असलेला मुख्यमंत्री आपण आजवर पाहिला नाही. त्यांचा कामाचा आवाका लक्षात घेता, जेष्ठ नेते वसंत दादा पाटील यांची आठवण येत असल्याचे ही त्यांनी नमूद करून, 2024 सालातली विधानसभा आपले लक्ष आहे. संधी मिळाल्यास बीड मतदारसंघातून निवडणूक लढवू, असा मनोदय ही प्रा. नवले यांनी यावेळी व्यक्त केला.

गुरूवार ता. 1 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी आयोजित केलेल्या गणेश उत्सवाच्या पहिल्या आरतीला प्रा. सुरेश नवले यांनी हजेरी लावून बाप्पाची आरती केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली. काँग्रेस सोडून मित्र मंडळाच्या माध्यमातून बीडच्या राजकारणात सक्रिय झालेले प्रा. नवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला असून, बीड विधानसभेच्या निवडणुक लढविणार असल्याची चर्चा आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री व्हायला नशीब थोर लागते. शिवसेना चार पाच वेळा फुटली. मात्र, शिंदे यांनी चाळीस आमदारांना घेऊन केलेला उठाव ऐतिहासिक होता. त्यांचे बंड एवढी साधी गोष्ट नव्हती. त्यांच्यासह चाळीस आमदारांच्या आयुष्याचा प्रश्न होता. ते प्रमाणीक असल्यानेच यशस्वी झालेत.
या उठावाची देशाच्या बाहेर चर्चा झाल्याचे सांगून ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारमुळे मागच्या ठाकरे सरकारचा कारभार चव्हाटय़ावर आला आहे. लोक तुलना करू लागलेत. आताचे मुख्यमंत्री एका तासात जेवढ्या नागरिकांना भेटतात. त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतात. गेल्या अडीच वर्षांत उध्दव ठाकरे तेवढ्या नागरिकांना सुद्धा भेटलेत का ? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. ठाकरे आजारी होते. मग, आता तो आजार कुठे गेला. कुठे ही आणि कोणालाही ते कसे चटकन भेट देऊ लागलेत. हा चमत्कार कसा काय झाला, असा खडा सवाल ही प्रा. नवले यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची पद्धत सर्व सामान्य घटकांना पसंत पडली असून, हे मुख्यमंत्री दिवसाचे 18 ,20 तास काम करून, नागरीक, कार्यकर्ते, आमदार, मंत्र्यांना वेळ देताहेत. इतिहासात त्याची नोंद होईल. जेष्ठ नेते वसंत दादा पाटील यांची आठवण करुन देणारा लोकसंपर्कातला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला,अशी भावना माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त करून,
बीडची विधानसभा आपले लक्ष असून, संधी मिळाल्यास ताकदीने निवडणुक लढविणार आहे. बीडच्या जनतेच्या भरोशावर 2024 ची विधानसभा फार अवघड गोष्ट नसल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे , शिंदे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख शिनुभाऊ बेदरे, गणेश पवार, माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल यांची यावेळी उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button