क्राईम

औरंगाबादेत तब्बल 62 लाखाचा विदेशी मद्य साठा पकडला

औरंगाबाद — राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईत लपवून ठेवलेल्या विदेशी मद्याचा 62 लाख 14 हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शुल्क विभागाने पैठणच्या इसारवाडी येथील विठ्ठलनगरमध्ये छापा मारला होता. यावेळी प्रकाश काकासाहेब साबळे आणि रौनक अंकुश मुळे यांच्याकडे रॉयल चॅलेंज व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेचे 30 खोके मिळून आले. त्यामुळे शुल्क विभागाने विदेशी मद्याचे खोके कुठून आणले याबाबत चौकशी केली. त्यावेळी सदरील विदेशी मद्याचे खोके इसारवाडी येथील पैठण-औरंगाबाद रोडवर उभे असलेल्या अशोक लेलैंड ट्रक क्रमांक एम.एच.20 डी.ई. 7325 मधून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार शुल्क विभागाच्या पथकाने तात्काळ अशोक लेलैंड ट्रकचा शोध घेतला असता, सदरील वाहन हे पैठण- औरंगाबाद रोडवर इसारवाडी शिवारात उभे असलेले दिसून आले. यावेळी शुल्क विभागाच्या पथकाने ट्रकची चौकशी केली असता, त्यात एकूण विदेशी मद्याचे 720 खोके आढळून आले. तर आधीचे 30 असे एकूण 750 विदेशी मद्याचे खोके पथकाला मिळून आले आहे. ज्याची एकूण किंमत 62 लाख 14 हजार असल्याची माहिती शुल्क विभागाने दिली आहे.
एवढ्या मोठ्याप्रमाणावर विदेशी दारूसाठ्यावर कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी प्रकाश काकासाहेब साबळे वय 27 वर्ष आणि रौनक अंकुश मुळे वय 23 वर्ष दोघेही रा. इसारवाडी, ता. पैठण जि. औरंगाबाद यांच्यासह वाहनचालक विकास काकासाहेब साबळे वय 24 वर्ष रा. इसारवाडी ता. पैठण जि. औरंगाबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक एस. के. वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष गुंजाळे, नवनाथ घुगे, आणि कर्मचारी राहुल बनकर, विनायक चव्हाण व हर्षल बारी यांच्या पथकाने केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button