‘आपले गुरुजी’नावाने वर्गात शिक्षकांचे फोटो भिंतीवर झळकणार

मुंबई — दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांना 5 टक्के आरक्षणाचा निर्णयामुळे सर्वच स्तरातून शिंदे सरकारवर टीका होत आहे.मात्र आता शिक्षण विभागाने एक अजब निर्णय घेत वर्गांमध्ये आता शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शाळा, महाविद्यालय किंवा शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रासाठी कार्य करणाऱ्या महान व्यक्तींचे फोटो आपण पाहत असतो. पण, आता वर्गांमध्ये शाळेच्या शिक्षकाचे फोटो लावावे, अशी अजब गजब कल्पना शिंदे सरकारने शोधून काढली आहे.
‘आपले गुरुजी’ या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावा याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. त्यानुसार, २ आठवड्यात याबाबत पुर्तता करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्गात स्वतः उपस्थित न राहता इतर कोणालाही पाठवायचे अशी प्रकरण वाढत असल्याने वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा अजब निर्णय सरकारने घेतला आहे.