आपला जिल्हा

‘त्या’ व्हायरल व्हीडिओ प्रकरणी चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश

बीड —- बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोना बाधित रुग्ण येथील जिल्हा रुग्णालयात इतरत्र फिरतानाचा एक व्हीडिओ आज (मंगळवार) रोजी व्हायरल झाला होता, हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

आष्टी तालुक्यात मुंबईहून आपल्या नातेवाईकांकडे आलेले असताना त्यातील ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून ११ वर गेली. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर उर्वरित सहा रुग्णांना त्यांच्या विनंतीनुसार पुण्याला पाठविण्यात आले.

या दरम्यानच आरोग्य विभागाकडून वारंवार सूचना करूनही हा रुग्ण नजर चुकवून फिरत असल्याचे उघड झाले.

परंतु कोरोना बाधित रुग्णाने असे फिरणे अत्यंत धोक्याचे असून ते इतर कित्येकांच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे यामागे नेमका कुणाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे याची चौकशी केली गेली पाहिजे, या गंभीर परिस्थितीत कोणाच्याही निष्काळजीपणाची गय केली जाणार नाही, असे ना. मुंडे म्हणाले.

जिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात असलेल्या कोविड कक्षांसह अलगिकरण कक्ष, शिक्का असलेले लोक तसेच लपून छपून जिल्ह्यात विनापरवानगी प्रवेश करत असलेले लोक यावर लक्ष ठेऊन याबाबतची माहिती तात्काळ आरोग्य विभाग व प्रशासनाला द्यावी असे आवाहनही ना. मुंडे यांनी केले आहे.

डॉक्टरांच्या ठिय्या आंदोलनाचीही ना. मुंडेंकडून दखल

दरम्यान बीड येथील कोरोना वॉर्डातील डॉक्टरांना जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करत काही डॉक्टरांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या आंदोलनाची पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेतली असून कोरोनाशी लढणारे डॉक्टर्स, इतर सर्व कर्मचारी, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यापैकी कोणालाही जेवण, पाणी तसेच इतर कोणत्याही व्यवस्थेबाबत कमतरता भासू नये अशा सक्त सूचना जिल्हा आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

या कठीण काळात केवळ रुग्णच नाही तर त्यांच्यासाठी अहोरात्र लढणारे सर्वच डॉक्टर्स व अन्य आरोग्य कर्मचारी यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा आरोग्य विभागाला आवश्यक सूचना केल्या असून, कोणत्याही परिस्थितीत निधी किंवा अन्य कोणत्याही बाबींची कमतरता भासू देणार नाही, डॉक्टर्स व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी धैर्याने काम करावे असे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close