मान्सून पंधरा दिवस आधीच घेणार निरोप !

पुणे — नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून देशात यंदा वेळेच्या आधाच दाखल झाला होता. तर वेळेच्या आधीच परतीच्या प्रवासावरही लवकरच निघण्याचे संकेत आहेत.
यंदाच्या हंगामात सर्वसाधारण वेळेच्या तीन दिवस आधी २९ मे रोजी मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला. अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी मॉन्सून तळकोकणात दाखल झाला. त्यानंतर १५ जून रोजी मॉन्सूनने जवळपास महाराष्ट्र व्यापला. पुढील वाटचालही काहीशी अडखळत झाली, तरीही नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच मॉन्सूनने देश व्यापला. २ जुलै रोजी मॉन्सून संपूर्ण देशभरात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
हवामान विभागानं २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या दोन आठवड्यांच्या कालावधीसाठीचा हवामान अंदाज गुरूवारी जाहीर केला. यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानातून मॉन्सून परतण्यास पोषक वातावरण तयार होत असल्याचं नमुद केलं.
पुर्वी १ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र २०२० मध्ये मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळपत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली. महिनाभराचा हंगाम शिल्लक असल्यानं या काळात किती पाऊस पडणार याकडे शेतकऱ्याचं लक्ष आहे.