क्रीडा व मनोरंजन

राष्ट्रीय विक्रमाची यशोगाथा” अविनाश साबळे यांच्या साहसी कामगिरीची कहाणी…! ✍️ सुभाष सुतार ✍️

आयुष्यात आलेले दारिद्र्य एखाद्या असाध्य रोगाने आलेल्या पांढर्‍या डागा सारखे असते. कितीही झाकले तरी ते उघडे पडतेच. ते फार काळ लपून राहत नाही. “तो” ही याच बिकट असलेल्या वैखरीच्या वाटेवर चालत राहीला आणि कष्टाच्या जोरावर यशापर्यंत गेला. त्याचे आई-वडील, भाऊ, बहीण त्याच्या पाठिशी उभे होते. आधी त्यांनी दारिद्र्याची शर्यत पार केली. वीटभट्टी च्या सानिध्यात राहीला. वीटभट्टीतून येणारा कुबट वास सहन केला. लोकशाहीर अण्णाभाऊ म्हणायचे, दारिद्र्याच्या साणेवर सुद्धा शौर्याला धार चढते. या अर्थाने, अविनाश साबळेने मोठा भीम पराक्रम करून बीडची माती आणखी सुगंधित केली आहे. बीडच्या या बहाद्दर भूमिपुत्राने अडथळ्यांची शर्यत जिंकली. केनियाचा 36 वर्षाचा इतिहास मोडून नवा विक्रम प्रस्थापित केल्याने, राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाने भारताची मान उंचावली आहे.
एबीपी माझा , ” या वृत्त वाहिणीवर ‘ रौप्य पदकाचा मानकरी अविनाश साबळे यांच्याशी गप्पा – गोष्टी झाल्या. एबीपीचे संपादक राजीवजी खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञानदा कदम , बीडचे एबीपीचे वार्ताहर गोविंद शेळके व अन्य पत्रकारांनी समरस होऊन अविनाश याच्याशी गप्पा मारल्या. हा संवाद माझा च्या वाहिणीने प्रेक्षकांसाठी अनेक वेळा दाखविला आहे.
माझा कट्टा वर पत्रकारांनी
बीडच्या ( महाराष्ट्र ) भूमिपुत्राची मुलाखत घेतली. अविनाश साबळे याने आपल्या कुटुंबाचा आजवरचा सर्व प्रवास उलगडून सांगितला. वीटभट्टीत तावूनसुलाखून निघालेले त्याचे कुटुंब. आलेल्या अडचणी, जगण्याची धडपड,
कुटुंबाची कुतरओढ, बहिणीच्या लग्नाचा प्रसंग, एकूणच अंगावर रोमांच उभे करणाऱ्या अनेक प्रसंगाने या कुटुबाची चिकाटी व मेहनत अधोरेखित होत गेली. साबळे कुटुंबाची कहाणी गरीबीचे, परिस्थितीचे चटके भोगणाऱ्या हरएक माणसाला प्रेरणा देणारी आहे.
राष्ट्रकुल रौप्य पदक विजेता ,भारतीय लष्कराचा जवान अविनाश साबळे यांनी सहन केलेल्या संकटाची आपबीती सोप्या शब्दात सांगितली. तो म्हणाला माझे कुटुंब मांडवा ता. आष्टी ( बीड ) येथील रहिवाशी. घरात आई- वडील आणि आम्ही भावंडे आहोत. दीड – दोन एक्कर कोरडवाहू शेती आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य , म्हणून आई – वडील मोलमजुरी करायचे. गावच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी जावे लागे. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर…! आई – वडीलांना पहाटे कामावर जावे लागायचे. आम्ही तीघे भावंडे लहान होतो. मी सर्वात थोरला होतो. आधी हुशार होतो. मात्र, सातवीनंतर अभ्यासाकडे दूलक्ष झाले.
खेळाला प्राधान्य दिल्याने अभ्यासाकडे वेळ देता आला नाही.
गावातून वीटभट्टीवर जाणे सोयीचे नव्हते म्हणून, आहे त्या ठिकाणी जाऊन झोपडी बांधून आम्ही राहायचो. पाऊस पडला की , शाळेत जाता यायचे नाही. काही वेळा शाळा बुडायची. शाळेत कुलकर्णी नावांचे गुरुजी होते. पोरगा रोज शाळेत पायी चालत येतो. त्याला शिकायची आवड आहे. मग , गुरुजींनी वाट वाकडी केली. कुलकर्णी सर त्यांच्या दुचाकीवरून शाळेत घेऊन जायचे. शाळेतल्या सरांनी खूप जीव लावला. पोरगा शाळेचे , गावचे , देशाचे नाव काढीन , या भावनेतून त्यांनी मदत केल्याचे अविनाश सांगतो. मी, नऊ वर्षाचा असताना एका शालेय स्पर्धेत पहिला आलो. शंभर रू चे बक्षीस मिळाले होते. बहिणीच्या लग्नासाठी बक्षिसांच्या पैशाचा उपयोग झाला. हे सांगताना अविनाशचे डोळे डबडबले होते. इयत्ता १० वी नंतर अविनाशने
गवंडी काम केले. ( मिस्त्रीच्या हाताखाली ) सिमेंटमुळे पाय पांढरे पडायचे. हाताला बारीक बारीक भोकं पडायची. जेवताना खूप वेदना व्हायच्या. तिखट भाजी हाताला लागायची आणि भाजीतले तिखट भोकं पडलेल्या हाताला लागून वेदना व्हायच्या, डोळ्यात पाणीच यायचे. दिवसाला 100 रु मिळायचे. कामावर असताना, आपल्याला कुणी पाहू नये , असा प्रयत्न करायचो. कामाची लाज वाटत नव्हती, पण कुणी उगीच पाहूनये असे वाटायचे. आम्हाला पक्के घर ही नव्हते. उसाचे पाचट ( वाढे ) घरावर छप्परासाठी वापरून झोपडी तयार करून राहत होतो.
आई पहाटेच उठून स्वयंपाक करायची आणि वीट – भट्टीच्या कामावर जायची. आमची दिवसभर भेट व्हायची नाही.
अविनाशने
स्टीपलचेस स्पर्धेतील यशाचा रोमांचकारी अनुभव ही
सांगितला.
तो म्हणाला, शेवटच्या काही अंतरासाठी ताकद राखून ठेवली होती. पाचशे मिटरवर असताना चौथ्या क्रमांकावर होतो. त्यानंतर ठरवून वेग वाढविला. तरीही काही मायक्रो सेंकदाने सुवर्ण पदक हुकले. चौथ्या क्रमांकावर असताना, भूतकाळातल्या कटू आठवणी जाग्या झाल्या. आई – बाबांचा संघर्ष दिसू लागला. त्या ध्येयाने धावलो.
यापुढचे ध्येय गोल्ड मेडल असणार आहे.
त्याने सांगितले, रोज पायी चालत जायचो. त्यामुळे, दररोज 12 किमी येणे जाणे व्हायचे. पळत जाऊन शाळा गाठायचो. नंतर, सवय लागली. खेळाने करिअर घडते. आज – काल पुस्तकाचे ओझे खूप झाले आहे. पुस्तकात डोके घालून बसणारी मुल पालकांना हवी आहेत. अभ्यास करावाच, ते चांगलेच आहे. परंतू , खेळाने आयुष्यात बदल घडविण्याची ताकद आहे. खेळाने करिअर घडते. शरीर सुदृढ होण्यास खेळ महत्त्वाचा आहे. आई – बाबा मुलांच्या पाठीवर एवढ्या मोठ्या दप्तरांच्या ओझ्याकडे दुर्लक्ष करतात. हे चुकीचे वाटते. आज, सरकार मदतीला तयार आहे. लोक ही मदत करतात,अशी भावना ही अविनाश ने व्यक्त करून त्या सर्वां विषयी कृतज्ञता असल्याचे त्याने सांगितले. भारतातल्या विविध भागात गेलो. देशाची सेवा करायच्या निमित्ताने अनेक राज्यात सेवा केली. धावण्याच्या स्पर्धेसाठी खूप ठिकाणे फिरून आलो. मात्र , आईच्या हातची भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा ( खर्डा ) त्याची चव कशालाच नसल्याचे त्याने सांगितले.आर्मी च्या ग्राऊंडवर पळायचो. तिथे आर्मीचे एक कोच होते. अमरीश कुमार…! त्यांना फॉलो करायचो. ते पळतात कसे, काय पथ्य पाळली पाहिजेत. या विषयी निरीक्षण करायचो. त्यांनी मला अनेद अनेकदा पळताना पाहिले. त्यांची भेट झाल्यावर ते म्हणाले , अरे अविनाश , तेरे में कुछ ना कुछ है…. ! तु कर सकता है…! चल आगे बढ..!
बारावी झाल्यावर मित्रांच्या आग्रहाने आर्मीत भरतीसाठी गेलो. शारिरीक दृष्ट्या फीट राहील्याचा असा काही फायदा झाला की , मी भर्ती झाल्याचे ही समजले नाही. माझ्या यशात रशियन कोच ( प्रशिक्षक ) निकोलो यांच्यासह शाळा , महाविद्यालय प्रवरा प्रबोधिनी यांचाही वाटा आहे. कोच सांगायचे, देख अविनाश, यश मिळाले असले तरी त्याचा कधी उन्माद करायचा नाही. एवढच लक्षात ठेव. तुला, देशासाठी आणखी मोठे स्वप्न पहाता येईल. निकोलो सरांनी हेच शिकवले. ते कामाला आले आहे. अविनाश म्हणाला, काही गोष्टी वेळेनुसारच मिळतात. आयुष्यात चढ – उतार येतात आणि जातात. त्यातून प्रेरणा घ्यायची असते. एकदा फॅक्चर झाले म्हणून स्पर्धेतून बाहेर राहीलो. एकदा कोविड ने घेरले पण जिद्द ठेवली म्हणून देशसेवेची उभारी मिळाली. कोणत्याही खेळात डिसिप्लीन महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी तयार असायला हवे. क्रीडापटू राहुल आवारे यांचा इंटरव्यू एबीपी. ” माझा कट्टा ” वर पाहिला होता. आपण देशासाठी पदक मिळवू आणि माझा कट्ट्यावर येऊत, अशी स्वप्न पहात होतो. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अविनाश याने दिली. तेव्हा सगळे वार्ताहर खळखळून हसले आणि दाद दिली. शेवटच्या क्षणी श्री. राजीव खांडेकर सरांनी अविनाशला जवळ घेतले. पाठीवर कौतुकाची थाप मारून आशीर्वाद दिले.अविनाश आणि अब्राहम किबीबोट यांच्यात शेवटच्या क्षणापर्यंत शर्यत झाली. श्वास रोखून धरवा,असे ते दृश्य पाहून अजून ही थरकाप उडतो. एका सेंकदा पेक्षा कमी सेकंदाने अविनाश चे गोल्ड मेडल हुकले.
वयाच्या 18 व्या वर्षी आर्मी, 23 व्या वर्षी राष्ट्रीय पदक, 37 व्या वर्षी मानाचे रौप्य पदक मिळवून नेत्रदीपक यश संपादन करणारा अविनाश तरुणाईचा आदर्श ठरावा, एवढीच अपेक्षा आहे. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा..!
                              सुभाष सुतार
( पत्रकार )
9404253386
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button