औरंगाबाद — महावितरण औरंगाबाद ग्रामीण मंडल अंतर्गत औरंगाबाद ग्रामीण, पैठण, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, कन्नड, पिशोर, वैजापूर , अजिंठा, सिल्लोड या उप विभागामधील घरगुती ग्राहकांनी अनेक महिन्यांपासून वीज देयकाचा भरणा न केल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकीचा डोंगर साचला आहे. त्यामुळे दिनांक २० ते २५ ऑगस्ट २०२२ या काळात थकीत बिल असणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महावितरणकडून करण्यात येणार आहे. तरी वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करण्याचे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.
महावितरणला वीज बिलाच्या प्रचंड थकबाकीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज ग्राहक वापरलेल्या वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. वीज ग्राहकांनी बिलाचा भरणा करावा यासाठी महावितरणकडून एसएमएस द्वारे सूचना देणे , भेटीद्वारे बिल भरण्याचे आवाहन करणे , पत्रव्यवहार करणे, देय दिनांकापूर्वी वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी बक्षीस योजना राबवणे आदी द्वारे ग्राहकांना संपर्क करून जनजागृती करण्यात येत आहे.
तसेच बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत बिल भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट मिळते. तसेच ऑनलाईन बिल भरल्यास 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट महावितरणतर्फे देण्यात येत आहे. तरीही काही घरगुती ग्राहक दरमाह वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत . त्यामुळे महावितरणला वीज बिल वसुलीसाठी कडक धोरण अवलंबून दिनांक-२० ते २५ ऑगस्ट या कालावधीत ग्राहकांकडे थकबाकी भरून घेणे , अथवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सक्त सूचना संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.