बीड –तालुक्यातील मेंगडेवाडी येथे भगरीच्या भाकरीतूनसह ते सात जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. गावात सुरू असलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमात ही घटना घडली.
गुरूवारी उपवासानिमित्त भगर आणली होती. सर्व भाविकांना भात तयार करून देण्यात आला होता. परंतू महाराजांसोबत असलेले भजनी, वादक, गायक यांनी भाकरी करण्यास सांगितले. भगर न धुताच भाकरी केल्या. त्यामुळे ज्या सहा सात लोकांनी भाकरी खाल्या, त्यांना मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला. ही माहिती समजताच चऱ्हाटा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश तांदळे, डॉ.बांगर, डॉ.मदन काकड, किशोर जाधव, रोहित घोगरे, अमोल गायकवाड यांनी गावात तात्काळ धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.चऱ्हाटा केंद्रात प्राथमिक उपचार करून सर्वांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट यांनीही सर्व माहिती घेऊन काळजी घेण्याच्या सुचना केल्या आहेत.