मुंबई — दहीहंडीला खेळाचा दर्जा देत त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली.
राज्य सरकारच्या खेळाडूंना दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचा लाभ नोकऱ्यांमध्ये गोविंदांनाही मिळणार आहे.
राज्यात होणार दहीहंडीच्या स्पर्धा
पुढील वर्षापासून राज्यात दहीहंडीच्या स्पर्धा भरवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली. प्रो गोविंदाप्रमाणे गोंविंदा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला आहे. राज्यात प्रो कब्बडी प्रमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. दहीहंडी आता एक दिवस नाही तर 365 दिवस खेळली जाणार आहे.
राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा
इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो. तसेच, काही गोविंदा जखमी होतात अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.
क्रिडा विभागाची अत्यंत महत्वाची बैठक
बुधवारी राज्याच्या क्रिडा विभागाची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती. आज या संबंधीत जीआर काढत या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.
साडेसात लाख रुपयांची मदत देण्यात येणार
दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना साडेसात लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली