बीड — अंबाजोगाईचे पोलिस निरीक्षक अवैध धंद्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत होते.तसेच हप्ते वसुलीचाही आरोप त्यांच्यावर झाला होता. याप्रकरणी नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात आवाज उठवताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी डीवायएसपी जायभाये यांची तातडीने बदली करत ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्याची घोषणा केली.
केजच्या आ. नमिता मुंदडा यांनी गुरुवारी दि.18 लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडली बीड जिल्ह्यातील धोक्यात आलेली कायदा- सुव्यवस्था आणि फोफावलेले अवैध धंदे या प्रश्नावर यापूर्वीच्या विधानसभा अधिवेशनात बरीच चर्चा झाली होती. त्यावरून तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांची तडकाफडकी बदली देखील करण्यात आली होती.
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणे, त्यांना पाठीशी घालणे. या प्रकरणी झालेल्या चौकशीत संबधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याची तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचीही अन्यत्र बदली करण्याची घोषणा गृहमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात केली.
मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर संबधित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आले असून या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात आपले कर्तव्य न बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.