बीड — शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताला नवे वळण मिळू लागले असून संशयाची छाया गडद झाली आहे. विनायक मेटे अपघात प्रकरणात मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या आरोपानंतर मेटे यांचे दुसरे चालक समाधान वाघमारे यांनी मोठा खुलासा केला असून ‘शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर बरचस सत्य बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे
समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. मात्र 14 तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते. समाधान वाघमारे म्हणाले की 3 ऑगस्ट रोजी आम्ही मुंबईच्या दिशेने जात होतो. या दरम्यान शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. या दरम्यान मी मेटे साहेबांना म्हणालो गाडी थांबवू का ? मात्र साहेब म्हणाले ते दारू प्यायले असतील, त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त 80 च्या स्पीडने होती. तर गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होता’.
त्या दिवशी मी जर गाडीवर असतो तर, मी स्वतःचा जीव दिला असता. मात्र, साहेबांना काहीही होऊ दिलं नसतं. मला वाटतं शिक्रापूरच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर यामध्ये बरंच काही मिळू शकतं, अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांचे चालक समाधान वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या अपघाताला वेगळे वळण लागलं आहे. त्यामुळे नवनवीन खुलासे आणि माहिती समोर येत असल्याने संशयाचे ढग अधिकच दाट होत असल्याच चित्र निर्माण झालं आहे