महाराष्ट्र

🇮🇳स्वातंत्र्याच्या पहाटेचा अमृत किरण शिंदे वस्तीवर कधी पोहोचणार? तो आपलाच भूभाग आहे हे प्रशासनाला कधी कळणार? 🇮🇳

बीड — एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करत आहे.तर दूसरीकडे बीड जिल्ह्यातील शिंदे वस्तीवर स्वातंत्र्याची अमृत पहाट उगवलीच नाही.आजही तराफ्याच्या सहाय्याने पाण्यातून वाट काढत बाह्य जगाशी संपर्क ठेवावा लागतो. रस्त्या अभावी वेळेवर उपचार मिळाला नाही म्हणून प्राण सोडावा लागतो.तर जीवावरचा खेळ करत शिक्षणाचा धडा गिरवावा लागतो. निवेदन ,अर्ज विनंत्या इतकंच नाही तर जलसमाधी आंदोलन करून देखील गेंड्याच्या कातड पांघरलेल्या प्रशासनाला घाम फुटलाच नाही. एकंदरच स्वातंत्र्याच अमृत शिंदे वस्तीवर पोहोचलच नाही.

सगळीकडून पाण्याने वेढलेली शिंदे वस्ती बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गापासून तीन किलोमीटर अंतरावर बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील मौजे.सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारं छोटस गाव. गावात जायला रस्ता नाही. आजही तराफ्याच्या साह्याने पाण्यातून वाट काढत बाह्य जगाशी संपर्क ठेवावा लागतो. प्रत्येक निवडणुकीत आश्वासनांची खैरात ग्रामस्थांना मिळते पण शेवटी निराशा त्यांची पाठ सोडायला तयार नाही.

शाळेला जायला रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून थर्माकोलच्या तराफ्यावरुन प्रवास करत ज्ञान अर्जन करावं लागतंय. एखादा आजारी पडलाच तर त्या रुग्णाला देखील असंच उपचारासाठी जावं लागतं. वेळेत पोहोचणच झालं नाही. तर तडफडून मरावं लागतं.

दूध दुभत भाजीपाला असला तरी बाजारात नेऊन विकण्याची सोय होऊच शकत नाही. सोय करायचीच म्हटलं तर प्राणाशी गाठ आलीच. याच वस्तीवरील लक्ष्मण परसराम शिंदे ला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते आजारी होते दवाखान्यात जाण्यासाठी तलावाच्या काठावर आले परंतु होडगा अलीकडच्या तिरावर असल्यामुळेच त्यांना तिथेच २ तास ताठकळत बसावे लागले.शेवटी मृत्यूशी दोन हात करताना ते हरले.

त्यांच्या अंत्यविधीला पाहुणेरावळे आले तेही जीव मुठीत धरून! जामखेड चे नगरसेवक दिगंबर चव्हाण हे देखील यावेळी आले. येताना तराफ्यावरून तोल जाऊन पाण्यात पडले. सुदैवाने वेळेत मदत मिळाली म्हणून ते वाचले पण हे सूदैव प्रत्येकाच्या वाट्याला येईल हे सांगणं अवघड आहे. याच स्थितीतून बाळासाहेब शिंदे यांना ही जावे लागले त्यांचे चुलते वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे सहा दिवसांपूर्वी वारले पंधरा वर्षापूर्वी याच कारणामुळे पत्नीशोकाला देखील त्यांना सामोरे जावे लागले. पाण्यात पडण्याच्या व कसाबसा जीव वाचवण्याच्या घटना रोजच्याच आहेत. ग्रामस्थांनी नेहमीच प्रशासनाला आर्त हाक दिली. पण त्याचा फायदा झालाच नाही. शिंदे वस्तीला स्वातंत्र्याचा परिस स्पर्श झाला नाही. अर्ज विनंत्या निवेदन देऊन उपयोग झाला नाही. इतकच नाही तर जलसमाधी आंदोलन गेल्या वर्षी 15 ऑगस्ट दिनी केलं पण पदरी काहीच पडलं नाही.
अखेर १५ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. किमान या सत्याग्रहानंतर तरी प्रशासनाला जाग येईल शिंदे वस्ती भारताचाच भूभाग आहे याची जाणीव होईल अशी अपेक्षा स्वातंत्र्याच्या अमृत काळात जनतेतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button