क्राईम

🇮🇳वडवाडीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई🇮🇳

बीड — तालुक्यातील वडवाडी येथील बळीराजा कृषी विज्ञान केंद्रात 4 ऑगस्ट रोजी सशस्त्र दरोडा टाकून पती-पत्नीस मारहाण करून सोन्या-चांदीसह लाखोंची रोकड लुटली होती. या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा तपास लावत दोन आरोपींच्या मुसक्या बांधल्या. यामध्ये पुर्वी बळीराजा कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यानेच दरोडा टाकल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दत्ता रमेश शिंदे (वय 27 वर्षे) आणि आकाश बापू काळे (वय 22 वर्षे) दोघे रा. कोळवाडीवाडी महादेवनगर, ता. कळंब अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेची माहिती अशी की, बीड तालुक्यातील वडवाडी येथे बळीराजा विज्ञान केंद्र आहे. या केंद्रात गेल्या काही दिवसांपूर्वी एक कामगार कामाला होता. येथील आर्थिक व्यवहाराबद्दल त्याला सर्व माहिती होती. त्याने काम सोडल्यानंतर आपण तेथे दरोडा टाकण्याचा प्लॅन केला आणि तेथे कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याला हाताशी धरले. बर्‍याच दिवस दरोडेखोरांनी कट रचल्यानंतर दि. 4 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे बळीराजा विज्ञान केंद्रात त्यांनी दरोडा टाकून अभिमान शाहूराव अवचार (वय 39) आणि त्यांची पत्नी यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व कार्यालयातील रोख असा एकूण 10 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी नेकनूर पोलिसात दि. 4 ऑगस्ट रोजी अभिमान अवचर यांच्या फिर्यादीवरून कलम 395, 397 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.गुन्हा दाखल होताच पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वत: यात लक्ष घालून तपासाची चक्रे फिरवली. नेकनूर पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास केला. तपास सुरू असताना बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीतील गुन्हेगारी वस्त्या पोलिसांनी तपासून काढल्या. या वेळी पोलिसांनी आपले खबरी नेमले होते. खबर्‍या मार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना बळीराजा विज्ञान केंद्रात कामगार असलेल्या कर्मचार्‍यानेच हा दरोडा टाकल्याचे समजले. पोलिसांनी त्या कामगाराच्या मुसक्या बांधत खाक्या दाखवताच त्याने आपण हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांना त्याने दिलेल्या माहितीनुसार काही वर्षापुर्वी काम सोडून गेला होता. मात्र त्याला येथील सर्व आर्थिक व्यवहार माहित होता त्यामुळे त्याने येथे दरोडा टाकण्याचा कट रचला. हा कट यशस्वी करण्यासाठी त्याने कार्यालयात कामाला असलेल्या एकाला गळाला लावले. हा दरोडा टाकण्यासाठी त्याला इतर साथीदारांची गरज असतानाच टोपणी पेढी, कळंब तालुक्यातील काही साथीदारांनी मदत केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये दत्ता रमेश शिंदे (वय 27), आकाश बापु काळे (वय 22) दोघे रा. कोठाळवाडी महादेवनगर ता. कळंब जि. उस्मानाबाद हे दरोड्यातील मुख्य सुत्रधार आहेत तर बलभीम बाबू काळे (वय 32) आणि अनिल ऊर्फ राहुल अंकुश शिंदे (दो. रा. कोठाळवाडी, महादेवनगर ता. कळंब) या आरोपींनी दरोड्यात आकाश काळे आणि दत्ता शिंदे याला मदत केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, नेकनूरचे पीआय मुस्तफा शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय संजय तुपे यांची उपस्थिती होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button