बीड — तालुका पुरवठा विभागातील कर्मचारी पाठबळ देत असल्यामुळे खाजगी व्यक्ती घरी बसून पुरवठा विभागाची ऑनलाइन काम करत आहे. त्यामुळे पुरवठा विभागच बदनाम होऊ लागला आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या व्यक्तीस समज देऊनही काहीच उपयोग झाला नाही. उलट त्याने केराची टोपली दाखवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कर्तव्यदक्ष जिल्हा पुरवठा अधिकारी मिळाल्यामुळे पुरवठा विभागाचा कारभार काही अंशी सुधारला असला तरी खाजगी व्यक्तीची लुडबुड बदनामीला कारणीभूत ठरत आहे. या खाजगी व्यक्ती संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली होती. याची तात्काळ दखल घेत त्या खाजगी व्यक्तीला ऑफिसच्या बाहेर हाकलून देत ऑफिसला कुलूप ठोकले. मात्र तालुका पुरवठा विभागातील कर्मचारी हे त्या व्यक्तीस पाठबळ देत आहेत. या व्यक्तीच्या घरीच ओटीपी देऊन ऑनलाईन तसेच चलन काढण्याची कामं करून घेतली जात आहेत. परिणामी सावळा गोंधळ घालण्याची मुभा या खाजगी व्यक्तीला मिळाली आहे. कर्मचाऱ्यांनाही त्यांचा हिस्सा या खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून मिळत असल्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेशच जर कर्मचारी मानायला तयार नाहीत ते खाजगी व्यक्तीला पाठबळ देत असतील तर पुरवठा विभाग बदनाम व्हायला कितीसा वेळ लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन या खाजगी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तालुका पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.