मुंबई — शिंदे फडणवीस सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला. अठरा आमदारांनी शपथ ग्रहण केल्यानंतर राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळातील 18 पैकी 17 मंत्र्यांवर आरोप असल्याची यादीच जाहीर केली. यामुळे खळबळ माजली आहे.
18 मंत्र्यांनी शपथ घेताच राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळातील 18 पैकी 17 मंत्र्यांवर आरोप असल्याची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी फोटोसह जाहीर करण्यात आली आहे. एकेकाळी भाजपाला गॅंग ऑफ वासेपुर अशी उपमा देणारे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये विसावले असल्याचं यादीत म्हटल आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असा निर्णय दिल्याचा आरोप तसेच 342 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये घोटाळा केल्याचा आरोप गिरीश महाजन यांच्यावर आहे. गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या गालांशी करत महिला वर्गाला अपमानित केल्याचं राष्ट्रवादीने आपल्या यादीत म्हटला आहे. आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर आहे तर संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात सत्तेत येण्याआधीच क्लीन चिट दिल्याचं म्हटलं आहे संदिपान भुमरे यांच्यावर कथित जमीन घोटाळ्यात न्यायालयाने तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले होते. सुरेश खाडे यांच्यावर मिरजेला दंगल नवी नाही अशी प्रक्षोपक भाषा करून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवेल पण मी भिकारी बनणार नाही अशी भूमिका तानाजी सावंत यांनी घेतल्याचा देखील आरोप ठेवला आहे. उदय सामंत यांची पदवी बोगस असल्याचा आरोप आहे. तर वरिष्ठ नेत्याचे गुणगान गाण्याच्या नादात दलित बांधवांच्या भावना दुखावल्याचं रवींद्र चव्हाण यांनी कृत्य केल्याचं म्हटलं आहे. नुकताच टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे आल्याचा आरोप आहे. बलात्कार पीडीतेची थट्टा करण्याची असंवेदनशीलता दाखवल्या प्रकरणी पीडीतेने दीपक केसरकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं आहे. मंगल प्रभात लोढा यांच्यावर खंडणी आणि फसवणुकीचे कथित आरोप आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडे किती लक्ष द्यायचे हे आता ठरवण्याची वेळ आली असल्याचा इशारा देणारे शंभूराजे देसाई आता सत्तेत बसले आहेत. 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी साडेबाराशे कोटी ची उलाढाल केल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आहे. अतुल सावे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करत एका तरुणाने टॉवर वर चढून आंदोलन केले होते.