बीड — भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास मोदी सरकार इव्हेंट म्हणून” हर घर तिरंगा” अभियान राबवत आहे. मात्र सत्तेवर येताच मेक इन इंडिया ची मोदींनी केलेली घोषणा केवळ वल्गनाच ठरल्याचा प्रत्यय अनेक वेळा आला. खादी ऐवजी पॉलिस्टरचा पर्याय दिल्यामुळे चीनमध्ये छपाई केलेले आयात पॉलिस्टर ध्वज प्रत्येकाच्या घरावर डौलाने फडकणार आहेत. त्यासाठी ध्वजसंहितेत मोठे बदल केले आहेत. भारतीयांच्या देशाभिमानात चीनचा खिसा मात्र गरम होणार आहे.
राष्ट्रध्वजाची आन-बान शान व मान सन्मान अबाधित राहावा यासाठी ध्वजसंहितेची निर्मिती केली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वजसंहितेमध्ये अनेक नियमांना डावलण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला. ध्वज निर्मितीत खादीचा वापर आज पर्यंत सुरू होता. स्वातंत्र्य चळवळ खादी आणि चरखा यांचा घनिष्ट संबंध आहे. गांधीजींचं अहिंसात्मक धोरण आणि स्वदेशीचा नारा या गोष्टी चळवळीशी जोडल्या गेलेल्या आहेत. हा धागा क्षिण करण्यासाठीच मोदी सरकारने यंत्रावरील निर्मित कापडावर राष्ट्र ध्वज तयार करण्यास परवानगी दिली गेली असावी अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.
“हर घर तिरंगा”हे अभियान राबवताना केंद्र सरकारने खादीला पर्याय म्हणून पॉलिस्टर ला परवानगी दिली. प्रखर राष्ट्राभिमान जनतेत चेतवण्यासाठी हा इव्हेंट साजरा केला जाणार असल्याचा दावा सरकार करत असलं तरी या इव्हेंटचे योग्य नियोजन केले गेले नाही. मेक इन इंडिया चा मोदींनी केलेला दावा हवेत विरून गेला आहे. आक्रमणकारी चीन पुढे लाल डोळे करुन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सल्ला देणारे नरेंद्र मोदी सत्तेत असताना मात्र चिनी वस्तूंना प्राधान्य देत असल्याचं दिसू लागला आहे. भारतीय हद्दीत घुसून चीनने भारताचा भूभाग बळकावून लाल झेंडे फडकवलेले असताना या मुद्द्याला बगल देत चीनकडून भारताचा तिरंगा बनवून घेत देशातील प्रत्येक घरावर तो डौलाने फडकवण्याचे शौर्य दाखवले जाणार आहे. चीन निर्मित राष्ट्रीय ध्वजापुढे भारतीय नतमस्तक होऊन त्याचे देश प्रेम ओसंडून वाहणार आहे. या सर्व प्रकारात चीनचा खजिना मात्र ओसंडून वाहणार आहे. मोदी सरकारने काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे ध्वजाची 20 इंच बाय 30 इंच अशा नव्या साईजला परवानगी देण्यात आली आहे वीस इंचाचे समान भाग करणे अशक्य असल्यामुळे एखाद्या रंगाची उंची कमी अधिक राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. ध्वजसंहिता या साईजचा उल्लेख नाही. ध्वजसंहिते बद्दलची जागरूकता जनतेत नसल्यामुळे ध्वज उलटा फडकवणे, नको तेथे फडकवणे, अन्य ध्वजापेक्षा कमी उंचीचा ठेवणे यासारखे प्रकार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रध्वज पक्या रंगाच्या केसरी पांढऱ्या हिरव्या अशा पट्ट्यांनी व मजबूत धाग्याने तयार केला जातो. ध्वज फाटू नये यासाठी मजबूत बाजू पट्ट्या लावल्या जातात मात्र आता यालाही बगल देण्यात आली आहे. भिजलेला चुरगळलेला अथवा मळलेला राष्ट्रध्वज फडकावण्यात येऊ नये असा नियम आहे. राष्ट्रध्वज खराब झाल्यास तो कसा नष्ट करावा याचा नियम ध्वजसंहितेत दिला आहे. मात्र तीस कोटी वाटले गेलेले राष्ट्रध्वज खराब झाल्यानंतर त्याची विल्हेवाट सरकार कशी लावणार असा प्रश्नही सुजाण सुजाण नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे.