चौसाळा — जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना चौसाळ्यातील बाजार बूनगे नेते थोबाडावर पट्टी बांधून गप्प बसले असले तरी, संदीप भैया तुमच्या जवळचा असलेला गुत्तेदार घोडके लेंडी पुलाचं काम करताना जनतेची थुका लावून मारत आहे. या सर्व घटनांमध्ये मात्र लोकप्रतिनिधी बाबत जनतेतून रोष निर्माण होत आहे. याची राजकीय किंमत चुकविण्याची वेळ आली असल्याचं चित्र निर्माण झाला आहे.
चौसाळ्या जवळील लेंडी नाल्यावरील पुलाचे काम सात-आठ महिने झाले संथ गतीने चालू आहे. गुत्तेदार घोडकेने तयार केलेला पर्याय रस्ता तब्बल दोन वेळेला वाहून गेला. काळ्या मातीचा भराव टाकून हा रस्ता तयार करण्यात आला पुन्हा पहिले पाढे ५५ त्याच पद्धतीने आता देखील तो काम करू लागला आहे. पुलासाठी उभारलेल्या भिंती देखील अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत. तुमची राजकीय कारकीर्द खुलत गेली तर तुमच्या कार्यकाळातच किमान दहा वेळेला तरी हा पूल पुन्हा पुन्हा बनवावा लागेल. संबंधित गुत्तेदार तुमच्या नावाचं कवच घेऊन गुत्तेदारी करत जनतेच्या तोंडाला पान पुसण्याचे काम करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंतेदेखील दबावा पोटी “ब्र ” काढायला तयार नाहीत. या सर्व प्रकारात जनतेची मात्र क्रूर चेष्टा केली जात आहे. पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे चौसाळ्याशी जनतेचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे रुग्णाला उपचारासाठी चौसाळा किंवा बीडला न्यायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गरोदर महिलेला आरोग्य सेवा कशी मिळणार? विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला शाळेला कस आणि कुठून जायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. चौसाळ्यात बाजार बूणग्या पुढाऱ्यांचा बाजार भरला आहे. स्थानिक पुढारी हातात बांगड्या भरून फुकटच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत. जनतेच्या प्रश्नाशी त्यांना कुठलं सुतक नाही. फक्त फुकट मत खात निवडून यायची स्वप्न पाहत आहेत. आमदार म्हणून आपल्याला निवडून दिलं याची खंत देखील जनतेला वाटू लागली आहे. निवडून आल्यापासून एकदा सुद्धा तोंड न दाखवलेले आपण सरकारी कामांच्या माध्यमातून देखील जनतेची होणारी हेळसांड तुमच्याबद्दलचा रोष निर्माण करू लागली आहे. येथील जनतेने चौसाळा हिंगणी शिव रस्ता थोडीशी डागडुजी करून चालू करावा म्हणून घोडके कडे मागणी केली. परंतु पुलाच्या कामात मिळणारा मलीदा सगळा माझाच अस म्हणत गुत्तेदाराने ही मागणी फेटाळून लावली. “अंदर मिट्टी उपर चूना असं म्हणून पुन्हा पर्यायी रस्त्याचे काम सुरू केलं असलं तरी ते किती दिवस टिकेल याची शंका जनतेतून व्यक्त केली जाऊ लागली आहे. संदीप भैय्या येणाऱ्या काळात चौसाळ्यावर वर्चस्व ठेवायचा असेल तर जनतेच्या प्रश्नांची ही काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे अन्यथा लेंडीमुळे निर्माण झालेला रोष नाल्याच्या पाण्यात तुमचं राजकीय भवितव्य बुडवायला जनता वेळ लावणार नाही.