देश विदेश

गुजरातमधील करोना फैलावाला नमस्ते ट्रम्प कार्यक्रम कारणीभूत ;एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

अहमदाबादगुजरातमधील करोना फैलावाला नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम कारणीभूत ठरला असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. एवढेच नव्हे तर, गुजरातमधील भाजप सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्या पक्षाने दिला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन महिन्यांपूर्वी भारताचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी गुुजरातच्या अहमदाबादमध्ये 24 फेब्रुवारीला नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या कार्यक्रमादरम्यान अहमदाबादेत झालेल्या रोड शोमध्ये ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्या रोड शोवेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्यानंतर मोटेरा स्टेडियमवर लाखभर जनसमुदायापुढे ट्रम्प आणि मोदींची भाषणे झाली.

आता त्या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी करोना फैलावासाठी जबाबदार धरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) जानेवारीतच सर्व देशांना गर्दीचे कार्यक्रम टाळण्याची सूचना केली होती. त्यानंतरही राजकीय लाभासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी अनेक परदेशी नागरिक आले.

कार्यक्रमासाठी लोकांना मोठ्या संख्येने बसगाड्यांमधून आणले गेले. त्यातून करोनाचा फैलाव झाला. त्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गुजरात सरकारची कृती निष्काळजीपणाची होती. त्याप्रकरणी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) मार्फत चौकशी केली जावी. त्या मागणीसाठी कॉंग्रेस गुजरात उच्च न्यायालयात लवकरच याचिका दाखल करणार असल्याच चावडा यांनी म्हटले.

दरम्यान, गुजरात भाजपने कॉंग्रेसचा आरोप निराधार असल्याची प्रतिक्रिया दिली. डब्लूएचओने करोना फैलावाला जागतिक साथ म्हणून जाहीर करण्याआधीच नमस्ते ट्रम्प कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला. त्या कार्यक्रमानंतर महिनाभराने गुजरातमध्ये पहिला करोनाबाधित आढळला, असे प्रदेश भाजपने म्हटले. त्यातून गुजरातमधील करोना फैलावावरून राजकारण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. करोनाबाधित आणि बळींच्या संख्येत गुजरात देशात दुसऱ्या स्थानावर आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close