बीड — गुटख्याच्या धंद्यातील कमाईच्या ‘क्षीरसागराच्या मोहात पडून “डोके” चा वापर करत गुटख्याची 23 पोते गायब करणाऱ्या कोळेकर बाबाच्या ‘धरणीधारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूरांनी जोरदार दणका दिला. लेखणीच्या एका फटकाऱ्यात निलंबित करत ” दे माय धरणी ठाय “अशी अवस्था करून टाकली.
माजी पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या काळात माफियागिरीने तोंड वर काढले होते.पो.अ. हर्ष पोद्दार यांच्या कार्यकाळानंतर राज्य हे कायद्याच आहे. कायदा सर्वांना समान आहे हे पोलीस यंत्रणा विसरून गेली होती. “हम करे सो कायदा” हे ब्रिद मध्यंतरी पोलीस यंत्रणेच्या मनात ठसलं होतं.मात्र बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची घडी बसवताना कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर कठोर निर्णय घेण्यात कुठेच कमी पडणार नाहीत हे आज सिद्ध करून दाखवलं
जे पूर्वी स्वामींच्या काळात जमत होतं ते आताही जमणारच असा विश्वास असल्यामुळेच पाटोदा पोलिसांनी पकडलेल्या गुटख्याच्या कंटेनर मधील 23 पोते गायब केले. विशेष बाब म्हणजे अवैध धंद्यावर करडी नजर ठेवणारे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पाटोदा पोलिसांना कर्नाटकातील बिदरहून पुण्याकडे चाललेला गूटख्याचा कंटेनर अडवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पाटोद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांच्या टीमने कारवाई करत कंटेनर सह गुटखा जप्त केला.मात्र पोलिसांनी कंटेनर मधील 50 पोते गुटख्याऐवजी कारवाईत केवळ 27 पोतेच दाखविला आणि 23 पोते गुटखा हुले कन्स्ट्रक्शन कार्यालयात पसार केल्याची बाब उघडकीस आली. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर , पोलीस संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके यांना निलंबित केले. त्यांच्या निलंबन आदेशातच हे आरोप ठेवण्यात आले आहेत . त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे .