देशातील जनता महागाई ने त्रस्त झाली असताना पॅकिंग केलेले अन्नधान्य आणि इतर वस्तूवर सरकारने जीएसटी लागू केल्यामुळे जगणे अवघड झाले असतानाच आता विज बिल दरवाढीचा झटका जनतेला बसणार आहे. देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने कोळसा आयात करावा लागणार असल्याचे कारण सरकारकडून सांगितले जात आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार 7.6 कोटी टन कोळसा आयात करण्याच्या तयारीत आहे. देशातील खाणींमधून कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने मागणीनुसार वीजनिर्मिती होत नाही. पावसामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादनावर आणखी परिणाम होईल.
मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारी कंपनी कोल इंडिया लिमिटेड सुमारे 1.5 कोटी टन कोळसा आयात करणार आहे. ही आयात महागडी ठरणार असल्याने हे पैसे वीज ग्राहकांकडून वसूल केले जातील. त्यामुळे आगामी काळात वीज बिल दर वाढीचा शॉक ग्राहकांना बसणार आहे.
देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी एनटीपीसी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन देखील सुमारे 2.3 कोटी टन कोळसा आयात करण्याची योजना आखत आहे. यासोबतच इतर सरकारी आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्याही त्यांचा वापर पूर्ण करण्यासाठी 3.8 कोटी टन कोळसा आयात करू शकतात. 2022 मध्येच देशात सुमारे 7.6 कोटी टन कोळसा जागतिक बाजाराच्या दरानुसार आयात केला जाईल.
80 पैसे प्रति युनिट पर्यंत वाढेल बिल
येत्या काही दिवसांत विजेच्या प्रति युनिट दरात 50 ते 80 पैशांनी वाढ होऊ शकते. काही अधिकार्यांनी सांगितले
की, बंदरापासून वीज केंद्र किती अंतरावर आहे यावर प्रति युनिट किमतीत वाढ अवलंबून असेल.
सध्या कंपन्यांना विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज 21 लाख टन कोळशाची गरज भासते.
मान्सूनमुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील कोळसा उत्पादनावर परिणाम होणार आहे.
त्यामुळे कंपन्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीचा मार्ग अवलंबावा लागणार आहे.
कंपन्यांनी म्हटले आहे की, 15 ऑगस्टनंतर कोळशाचा तुटवडा सुरू होईल. पण आयातीतून त्याची भरपाई केली जाईल.15 ऑक्टोबरनंतर परिस्थिती ठिक होईल. कारण त्यानंतर विजेचा वापर कमी होईल आणि पावसाळा संपल्यानंतर कोळशाचे उत्पादनही वाढू शकेल.