श्री.खोलेश्वर विद्यालयाचा गुणगौरव सोहळा संपन्न
अंबाजोगाई — ‘ सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या वातावरणात सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धा परीक्षांना सामोरे जा व आपल्या जीवनात खूप मोठे यश संपादन करून आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करा, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे यांनी केले.
भा.शि.प्र.संस्थेच्या श्री.खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शालांत व विविध परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव स्व.गोपिनाथरावजी मुंडे सभागृहात पार पडला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राम कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामधे विद्यार्थी जीवनामध्ये संस्कारांचे महत्व सांगतांना या शाळेने केलेले संस्कार विद्यार्थ्यांना जीवनभर शिदोरी रुपाने सोबत राहणार असल्याचे सांगितले.श्री खोलेश्वर विद्यालयाने समाजाचा विश्वास सार्थ ठरवून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह मा.श्री.बिपीन दादा क्षीरसागर हे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बिपीन दादा क्षीरसागर यांनी , ‘ यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिद्द व चिकाटी मनात ठेवली तर यश हमखास मिळते,विद्यार्थ्यांनी या सूत्राचा उपयोग आपल्या जीवनात करावा. आजच्या स्पर्धात्मक युगात कोणत्याही स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सक्षम असले पाहीजे.कोणत्याही क्षेत्रात गेलात तरीही त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन , दीपप्रज्वलन करण्यात आले व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.त्यानंतर या कार्यक्रमात शालान्त प्रमाणपत्र परीक्षा तसेच विविध शालाबाह्य परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी तसेच विवेक ग्राम वरवटी येथील गुणवंत विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी व पालकांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र , विविध बक्षिसं पुष्पगुच्छ व पेढा भरवून मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी १०० % गुण घेऊन महाराष्ट्रातुन प्रथम आलेल्या कु.गौरी देशपांडे हिने अत्यंत भावनिक असे मनोगत व्यक्त केले.चि.यज्ञेश धाट याने सुमधुर पद्य गायले.
या कार्यक्रमासाठी खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह मा.श्री.बिपीन दादा क्षीरसागर ,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी, सौ. वर्षाताई मुंडे,शालेय समिती अध्यक्षा सौ.शरयुताई हेबाळकर, मुख्याध्यापक महेश कस्तुर,प्राचार्य मुकुंद देवर्षी, दहावी प्रमुख मधुकर जाधव हे व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक महेश कस्तुरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगतांना गुणवंत विद्यार्थी हेच आमचे खरे वैभव असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र शेप,श्रीकांत काळे,मोरेश्वर देशपांडे स्वागत व परिचय सौ.सुरेखा काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मधुकर जाधव यांनी मानले तर कल्याणमंत्र मंगेश मुळी यांनी सांगीतला .
याप्रसंगी संस्था सभासद, माजी शिक्षक, पत्रकार, अनेक मान्यवर व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक नंदकिशोर झरीकर,पर्यवेक्षक अरूण पत्की , विभाग प्रमुख प्रशांत पिंपळे ,विवेक जोशी, राजेंद्र शेप तसेच सर्व शिक्षक बंधुभगीनी,कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.