आरोग्य व शिक्षण

शाळा सुरू झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना मिळणार निकालपत्र

पुणेराज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने गेल्या महिन्यापासून शाळा बंद आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या असून त्यांना थेट पुढच्या वर्गात पाठविले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना सन 2020-21 नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झाल्यानंतरच निकालपत्र (प्रगतीपत्र) देण्यात येणार आहेत.

करोनामुळे शालेय कामकाज, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निकाल तयार करणे यात अडचणी येत होत्या. अखेर शासनानेच त्याबाबत आदेश जारी करत मार्गदर्शन सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना फतवाही पाठविला आहे. राज्यात सर्व शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रक्रिया सुरू आहे. शासन निर्णयानुसार प्रथम सत्र व द्वितीय सत्रांतर्गत स्वतंत्रपणे आकारिक व संकलित मूल्यमापन करण्यात येते. प्रथम सत्राची आकारिक व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. द्वितीय सत्राचे मूल्यमापन होऊ शकले नाही. द्वितीय सत्राचे संकलित मूल्यमापन न करता विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा बोलावू नये, असेही आदेशात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत नोंदवही व प्रगतीपत्रकातील नोंदी करण्याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. निकालाबाबत सुसूत्रता व एक वाक्‍यता राखणे गरजेचे असल्याने शाळांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रथम सत्राचे मूल्यमापन यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यानुसार नोंदी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

द्वितीय सत्राचे मूल्यमापन करताना आकारिक मूल्यमापन पूर्ण झाले आहे. मात्र संकलित मूल्यमापन पूर्ण नाही. त्यामुळे आकारिक मुल्यमापनासाठी निश्‍चित केलेल्या गुणांचे शंभर गुणात रुपांतर करून श्रेणी देण्यात यावी. ती श्रेणी विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकात नोंदविण्यात यावी. त्या आधारे द्वितीय सत्राचे मूल्यमापन जाहीर करण्यात यावे. श्रेणी काढण्याचे सूत्र निश्‍चित केले आहे. त्याआधारेच निकालपत्र तयार करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.

“निर्देशांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या’
द्वितीय सत्राच्या शेवटच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशासाठी पात्र ठरविले आहे. याची व पुढील शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार याची माहिती पालकांना कळवावी लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. लॉकडाऊन उठल्यानंतर व पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सूचनांचे तंतोतंत पालन करावे. आपआपल्या तालुक्‍यातील सर्व व्यवस्थापनांच्या माध्यमाच्या शाळांना सूचना देण्यात याव्यात, असे आदेशही सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना बजाविण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत शाळांनाही परिपत्रके पाठविण्यात येऊ लागली आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close