परळी — तालुक्यातील तडोळी येथे पुण्यतिथीच्या कार्यक्रमातील जेवणातून जवळपास 24 ग्रामस्थांना विषबाधा झाली. ही घटना गुरुवार दि.7 जूलै रोजी सायंकाळी घडली. सर्व बाधितांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तडोळी येथे गुरुवारी गोविंद किसन सातभाई यांच्या आईच्या पुण्यतिथी निमित्त जेवणाची पंगत आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने बहुतांशी ग्रामस्थांनी पंगतीत जेवण केले. त्यापैकी काही जणांना सायंकाळी उलटी आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या एकूण 24 बाधितांवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अधीष्ठाता डॉ. खैरेंनी केली रुग्णांची पाहणी
विषबाधेचे रुग्ण येणार असल्याचे समजल्या नंतर स्वारातीचे अधीष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी तातडीने उपचार करण्यासाठी यंत्रणा तयार ठेवण्याच्या सुचना केल्या. डॉ. खैरे यांनी स्वतः अपघात विभागात थांबून सर्व रुग्णांची चौकशी केली. यावेळी त्यांच्या समवेत डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. नागेश अब्दागिरे उपस्थित होते. आ. धनंजय मुंडे दूरध्वनीवरून संपर्कात
घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी स्वीय सहाय्यक खंडू गोरे यांना रुग्णांच्या मदतीसाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले. आ. मुंडे वेळोवेळी गोरे यांच्याकडून रुग्णांची परिस्थिती जाणून घेत होते.