बीड — बॅंकेचा कारभार हा ग्राहकांच्या क्रेडिट वर चालतो मात्र एसबीआय च्या चौसाळा शाखेत समोरचा ग्राहक कसा आहे त्याला कितपत किंमत द्यायची याचा सल्ला रोजंदारी सफाई कामगार देतो अन् त्या अनुषंगानेच ग्राहकाला वागणूक मिळत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
चौसाळा शाखेच्या अजब गजब कारभाराचे एक एक किस्से बाहेर पडू लागले आहेत. बँकेचा शाखाधिकारी असल्याचा थाट रोजंदारी सफाई कामगाराचा आहे. विशेष म्हणजे बँकेच्या कामकाजात या सफाई कामगाराचा मोलाचा सल्ला घेतला जात असल्यामुळे हा सफाई कामगार आपणच एकटे महा ‘वीर’असल्याच्या अविर्भावात ग्राहकांशी वर्तवणूक ठेवतो. शाखाधिकारी डांगे यांचा तो ‘खास’ माणूस असल्यामुळे फिल्ड ऑफिसरला कामकाजासाठी असलेली बँकेची मोटार सायकल याच्यात ताब्यात दिली गेली आहे. बँकेच्या पीक कर्जाची वसुली चा ठेका देखील या कामगाराने घेतल्याचं पाहायला मिळू लागला आहे. बँकेत आलेल्या ग्राहकाला कर्जाची रक्कम भरा म्हणून शाखाधिकारी एक वेळ म्हणणार नाही पण ग्राहकाने बँकेत पाय ठेवताच सफाई कामगार मात्र अहो पाटील तूमच्याकडे असलेले तेवढे कर्ज भरा असा आवाज देऊन सर्वांसमक्ष त्या ग्राहकाची इज्जत चव्हाट्यावर आणतो हे त्याच काम नित्याचं झाल आहे. पण शाखाधिकारीच या सफाई कामगाराच्या ओंजळीने पाणी पीत असेल तर तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न ग्राहकांपुढे निर्माण होऊ लागला आहे. बँकेत पीक कर्ज मागण्यासाठी ग्राहक आला तर त्या ग्राहकाला सफाई कामगाराच्या मर्जीत उतरावं लागतं. याची मर्जी सांभाळली नाही तर पीक कर्ज मिळेल की नाही याची शाश्वती देखील देता येत नाही. अन् मिळवायचच म्हटलं तर कागदपत्र देता देता ग्राहकाचे तीन टाक वाजवण्याच काम ही व्यक्ती करते. बँकेतून कागदपत्र गहाळ होण्याची प्रकरण देखील कमी घडत नाहीत. वाढीव कर्ज प्रकरण असेल तर खास मर्जी सफाई कामगाराची संपादन करावे लागते. बँकेचा कारभारच सफाई कामगाराच्या सल्ल्यावर चालत असेल तर बँकेत शाखाधिकारी पदाची गरज काय? त्याच्यावर लाखो रुपये पगार खर्च करण्याची आवश्यकता का भासावी? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चौसाळ्यात दुसरी राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे शेतकरी व्यापारी यांची कुचंबना होऊ लागली आहे. एसबीआय च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.