मुंबई — विधानसभेत भाजप आणि शिंदे गटानं बहुमतानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. तर भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं. बहुमत चाचणीत भाजप-शिंदे गटाला 164 मतं मिळाली.तर दुरीकडे महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना महाराष्ट्रातील जनतेला लवकरच पेट्रोल डिझेलवर दिलासा देणार असल्याची घोषणा केली.
यापूर्वीच केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील कर कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील आपले कर कमी केले नव्हते. त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर अधिकच होते. दरम्यान, आता महाराष्ट्रातील सरकारनं पेट्रोल डिझेलवर लवकरच कर कपात करणार असल्याची माहिती दिली. लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असून राज्यातील जनतेला दिलासा देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दिवाळीमध्ये पंतप्रधान मोदींनी पेट्रोल, डिझेलवरील अबकारी कर कमी केला होता. मात्र, ठाकरे सरकारने आम्हाला जीएसटी परतावा दिलेला नाही, यामुळे पेट्रोल, डिझेलवरील कर कमी होणार नाही, अशा शब्दांत कर कपात फेटाळली होती. यामुळे इतर राज्यांत 15- 20 रुपयांनी इंधनाचे दर कमी झाले तरी राज्यात मात्र, केंद्राच्याच दर कपातीवर समाधान मानावे लागले होते. पुन्हा दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी कर कमी केला, तेव्हा देखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात व्हॅट कपात करण्यास नकार दिला होता. मोदींना राज्यांनाही कर कपात करण्याचे आवाहन केलं होतं. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर ठाकरेंनी त्यास आपला नकार का, हे सांगितलं होतं. तसेच केंद्राच्या दर कपातीवर राज्याचा जो कर कमी झाला तीच आपली दरकपात असल्याचं भासविलं होतं.