राजकीय

विधान परिषदेवर जाण्याची एकनाथ खडसेंनी व्यक्त केली इच्छा; भाजपा न्याय देणार का ?

जळगावभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खडसे यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे फोन करून तशी इच्छा व्यक्त केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे त्यामुळे खडसेंबाबत भाजप काय निर्णय घेणार? त्यांचे पुनर्वसन करणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. 

येत्या २१ मे रोजी राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खडसे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. राज्यसभेसाठी महाराष्ट्र भाजपकडून माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण राष्ट्रीय राजकारणात मला रस नसल्याने मी राज्यसभेवर जाण्यास नकार दिला. राज्याच्या राजकारणात मला अधिक रस आहे. मला राज्याच्या राजकारणात सक्रिय व्हायचं आहे. तशी इच्छाच मी पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली असून विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असल्याचं स्पष्ट केलं आहे, असं खडसे यांनी सांगितले.
खडसे यांनी भाजपच्या विस्तारासाठी ४० वर्षे प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त करणं योग्य आहे. पक्षाने त्यांच्या नावाचा विचार करावा असं मला वाटतं. पण पक्षाचा प्रत्येक निर्णय केंद्रीय पातळीवर होत असतो, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मागच्यावेळी राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. राज्यातील सर्व नेत्यांचा त्यांना पाठिंबा होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close