ताज्या घडामोडी

चौसाळा:शेतकरी हलाल करण्यासाठी खिंडीत गाठला; सक्तीच्या पीक कर्ज वसुलीसाठी चालू खाती होल्ड केली

बीड — सध्या पेरणीचे दिवस सुरू असताना सक्तीच्या पिक कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांची चालू खाती होल्ड करून अडवणूक करण्याचा प्रताप चौसाळ्याच्या एसबीआय शाखेकडून केला जात असल्याने शेतकरी खिंडीत सापडला आहे.चाढ्यावर मुठ धरायची की पीक कर्ज खात नवं जुनं करण्यासाठी बँकेचे उंबरे झिजवायचे असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.

घरात मढ असलं तरी ते झाकून खरिपाची पेरणी करावी अशी रीत शेतकरी वर्गात आहे. मूठी आणि ओटीच्या उत्पन्नात फरक पडतो अशी धारणा शेतकऱ्यांची आहे. असा असताना उशिरा का होईना वरून राजाने कृपा केली मनासारखा पाऊस झाला असला तरी ऐन चाढ्यावर मुठ धरण्याच्या वेळीच बळीराजाची अडवणूक करत पीक कर्ज वसुलीसाठी एसबीआयच्या चौसाळा शाखेने तगादा लावला आहे. तात्काळ पिक कर्ज भराव यासाठी चालू खाती होल्ड केली गेली आहेत. त्यामुळे बँकेत पैसा असला तरी पेरणीसाठी खाजगी सावकारांचे उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे. आधीच बँकेचा कारभार स्थानिक शेठ सावकाराच्या सल्ला मसलतीने सुरू आहे त्यातून शेतकऱ्यांची खाती होल्ड केल्यामुळे याच शेठ सावकारांच्या दारात शेतकऱ्यांनी जावं यासाठी तर ही उठा ठेव शाखा व्यवस्थापकाने केली नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.पेरणी सुरू असताना खत बी यांची सोय लावत आधी पेरणी करायची की पीक कर्ज खाते नवे जुने करायचे यासाठी बँकेचे उंबरे झिजवायचे अशा प्रश्नात शेतकरी अडकला आहे. एकंदरच राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे शेतकऱ्यांना कोणीच वाली उरला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी आत्महत्यांच सत्र जिल्ह्यात सुरू असताना बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांची अशी अडवणूक करत असेल तर आणखी एखादी आत्महत्या चौसाळा परिसरात झाली तर शाखा व्यवस्थापकास दोषी धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button