महाराष्ट्र

अंबाजोगाई : दूहेरी खून खटल्यात चौघांना जन्मठेप Ambajogai: Four sentenced to life imprisonment in double murder case

अंबाजोगाई — जमिनीच्या वादातून तडोळा शिवारात एका शेतकर्‍यासह साक्षीदाराचा कोयत्याने खून केल्याची घटना नऊ वर्षांपूर्वी घडली होती. याप्रकरणी 11 आरोपीपैकी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा तर, साक्षीदाराला जखमी केल्याप्रकरणी इतर दोघांना दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम.बी.पटवारी यांनी सुनावली. याच गुन्ह्यातील पाच महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

रेणापुर तालुक्यातील वांगदरी येथील वसंत मुकूंदराव कराड यांची तडोळा शिवारात गट नं.147 व 148 मध्ये जमिनी असून या जमिनीत ऊस पिकाची लागवड केलेली होती. दिनांक 16 एप्रिल 2012 रोजी ऊस काढणीला आल्यावर शेताशेजारी असलेले आरोपीं कराड यांच्या शेतातील ऊस तोडून घेवून जात होते. कराड यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी आरोपींनी त्यांच्या हातातील कोयता व कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यात, पाठीवर गंभीर जखमा केल्या व साक्षीदार गणेश गंभीरे, तत्कालीन सरपंच बबन कराड यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात वसंत मुकुंदराव कराड, लक्ष्मण गंभीरे, गणेश गंभीरे, बबन कराड हे गंभीररित्या जखमी झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती. रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वसंत मुकुंदराज कराड हे मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर उपचार सुरू असताना लक्ष्मण नरहरी गंभीरे यांचा मृत्यू झाला. सदर घटनेवरून गणेश सुदाम गंभीरे यांच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलिसात तडोळा येथील 11 आरोपी विरोधात कलम 302, 307, 326, 324 भा.द.वि.सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा संपुर्ण तपास करून आरोपी विरूद्धचे दोषारोप पत्र बर्दापुर पोलिसांनी अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात दाखल केले. जखमींचा व डॉक्टरांचा उत्तरीय तपासणी अहवाल व सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम.बी.पटवारी यांनी मदन ग्यानदेव पुजारी व महादेव ग्यानदेव पुजारी यांना वसंत कराड यांच्या खूनाबद्दल दोषी धरून जन्मठेप व दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच हल्ला करतेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या लक्ष्मण नरहरी गंभीरे यांच्याही खून प्रकरणात बळीराम ग्यानदेव पुजारी व अंकुश ग्यानदेव पुजारी यांना देखील जन्मठेप व दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला तर घटना स्थळावरील साक्षीदाराला मारहाण केल्याबद्दल अरूण ग्यानदेव पुजारी, राजकुमार ग्यानदेव पुजारी यांना कलम 324 प्रमाणे एक वर्ष तर कलम 326 प्रमाणे दोन वर्षाची सक्तमजुरी सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड.लक्ष्मण फड यांनी काम पाहिले तर त्यांना अ‍ॅड. अनंत तिडके यांनी सहकार्य केले. या प्रकरणात पो.हे.का. गोविंद कदम व बी.एस. सोडगिर यांनी महत्वाची भूमिका बजावली. घटनेच्या 9 वर्षानंतर नातेवाईकांना न्याय मिळाल्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी न्याया बद्दल समाधान व्यक्त केले आहे. .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close