आपला जिल्हा

आज पासून राज्यातील शाळांना 14 दिवसांची दिवाळी सुट्टी A 14-day Diwali holiday for schools in the state from today

मूंबई — कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या शाळांमध्ये उद्यापासून शुकशुकाट होणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने दिवाळीची सुट्टी जाहीर केली असून, 28 ऑक्टोबर पासून पुढील 14 दिवस शाळा बंद असणार आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तर शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळातील स्थिती पूर्वपदावर येत असताना विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीचे वेध लागले होते. अखेर त्याबद्दलची घोषणा आज करण्यात आली.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलचा निर्णय जाहीर केला. ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी सणाची सुटी असेल. या कालावधीत शाळांकडून सुरू असलेल्या ऑनलाईन शिकवण्याही बंद राहतील. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा’, असं वर्षा गायकवाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दिवाळीनंतर पहिलीच्या वर्गापासून शाळा होणार सुरू?

कोरोनाची आटोक्यात आलेली परिस्थिती आणि शिक्षण तज्ज्ञांसह पालकांकडून होत असलेल्या मागणीचा विचार करत राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास सुरूवात केली. तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या आरोग्याला धोका वर्तवण्यात आलेला असल्याने सरकारने ठराविक वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, दिवाळीनंतर कोरोना परिस्थिती अशीच राहिल्यास इतर सेवांबरोबर पहिलीच्या वर्गापासून शाळा सुरू करण्याचा विचार सरकारचा सुरू आहे. इतर सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबरोबरच सरकार शाळांच्या बाबतीत निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शाळा पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याचं दिवाळीनंतर बघायला मिळू शकतं.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close