आपला जिल्हा

अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे टाकळगाव बॅरेजच्या कामास मंजुरी Approval for work of Takalgaon Barrage due to pursuit of Amarsingh Pandit

गेवराई —  सिंदफणा नदीवरील टाकळगाव बंधार्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामास महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सातत्याने या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या बीड जिल्हा दौऱ्यानंतर त्यांनी या कामास मंजुरी दिली आहे. या बॅरेजमुळे सुमारे २५० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कामाच्या सर्व्हेक्षण व अन्वेषणाचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सिंदफणा नदीवरील टाकळगाव को.प.बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याची मागणी सातत्याने शासनाकडे केली होती. यासाठी त्यांनी विधान परिषदेमध्ये याविषयी चर्चा घडवून आणली होती. सन २०१६ पासून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर आज यश आले असून महाविकास आघाडी सरकारने सुमारे १५० कोटी रुपयांच्या टाकळगाव बॅरेजच्या कामास मंजुरी दिली आहे. यापूर्वीही अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नांमुळे सिंदफणा नदीवर सिरसमार्ग बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. टाकळगाव बॅरेजमुळे सिरसमार्ग पासून टाकळगाव पर्यंत सुमारे १२ किमी नदीपात्रात पाणी साठणार असून २५० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. २.२२ द.ल.घ.मी. साठवण क्षमतेच्या या प्रकल्पामुळे टाकळगाव, पिंपळगाव कानडा, हिरापूर, पारगाव जप्ती, नांदुर हवेली, हिंगणी हवेली, खामगाव, पेंडगाव, माळापूरी, आहेरवाहेगाव, पाडळसिंगी आदी गावातील शेतकऱ्यांना या बॅरेजचा लाभ होणार आहे. जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या बीड जिल्हा दौऱ्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकल्पाला मंजुरी देवून गुरुवार, दि.२१ रोजी अमरसिंह पंडित यांना प्रकल्पाच्या मान्यतेचे पत्र दिले.

जलसंपदा विभागाच्या मान्यतेने पहिल्या टप्प्यात बॅरेजच्या सर्व्हेक्षण आणि अन्वेषणाच्या कामास तातडीने सुरुवात होणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. सुमारे चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांनी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत. बंधाऱ्याच्या कामास मंजुरी दिल्याबद्दल सभापती बाबुराव जाधव, सभापती जगनपाटील काळे, माजी सभापती अप्पासाहेब गव्हाणे, मुजीब पठाण, शाहेद पटेल, राम महाराज बुधनर, ताहेर पठाण, अ‍ॅड.योगेश गव्हाणे, विकास (बाबा) गव्हाणे, अशोक ढास, मधुकर मुंंजाळ, दत्ता तिपाले आदींनी माजी आ.अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त करून आनंदोत्सव साजरा केला.

सततच्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या भागात मोठा सिंचन प्रकल्प मंजुर झाल्यामुळे या भागातील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close